खान्देश टाइम्स न्यूज | जकी अहमद | छत्रपती संभाजी नगरकडून धुळ्याच्या दिशेने एक जात असलेला ट्रक बांभोरीजवळ पेट्रोल पंपावर थांबला. दुर्गंधी येत असल्याने तरुणांनी ट्रक थांबवला. पोलीस लागलीच घटनास्थळी पोहचले आणि ट्रक पाळधी पोलिसात नेणे सुरू केले. बायपासच्या एका गोडवून बाहेर ट्रकची तपासणी केली असता त्यात जनावरांचे चामडे आढळून आले. पथकाने नमुने घेतल्यानंतर अचानक तरुण आक्रमक झाले आणि एका बाजूने दगडफेक सुरू झाली. पोलीस जमावाला नियंत्रित करीत असताना काही तरुणांनी घोषणाबाजी करीत ट्रकला आग लावली.
छत्रपती संभाजी नगरकडून धुळ्याच्या दिशेने ट्रक क्रमांक युपी.९३.एटी.८१३५ हा जात होता. बांभोरी येथे रात्री १०.३० वाजेच्या सुमारास ट्रक एक पेट्रोल पंपावर थांबला असता त्यातून दुर्गंधी येत होती. त्यामुळे यातून गोमांसाची वाहतूक होत असल्याचा संशय काही जणांना आला. त्यांनी ट्रक चालकाला थांबवून ठेवले. पंपावर गर्दी होत असल्याने काहींनी या संदर्भात पाळधी पोलीस दूरक्षेत्राच्या कर्मचार्यांना माहिती दिली. पोलिसांनी धाव घेत माहिती घेऊन ट्रकला पाळधी बायपास येथील गोडावूनकडे रवाना केले.
ट्रक चालक सल्लू खान बाबू खान आणि क्लिनर मानसिंग श्रीराम कुश्वा दोघी राहणार उत्तरप्रदेश यांच्याकडून पोलीस अधिकारी माहिती घेत होते. घटनास्थळी परिरक्षावधीन उपविभागीय पोलीस अधिकारी आप्पासो पवार व धरणगाव पोलीस ठाण्याचे निरीक्षक यांच्यासह पथक पोहचले होते. अन्न व औषध प्रशासन विभागाचे अधिकारी यांनी ट्रकची तपासणी केली असता त्यात जनावरांचे कातडे असल्याचे आढळून आले. त्यांनी नमुने घेतले आणि ट्रक गोदाममध्ये लावण्याचे सांगितले. ट्रकमधून दुर्गंधी येत असल्याने ट्रक शहराच्या बाहेर असलेल्या गोदाममध्ये लावण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला होता. सर्व सुरळीत आणि शांततेत पार पडत असताना अचानक जमाव वाढला आणि हस्तक्षेप करू लागला.
पोलिसांनी जमावाला पांगवण्याचे प्रयत्न केले असता काही तरुण आक्रमक झाल्याने पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. जमाव महामार्गाच्या दिशेने आणि पाळधी गावाच्या दिशेने पळाला. पोलिसांपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या जमावापैकी काही तरुणांनी अचानक घोषणाबाजी करीत पोलिसांवर दगडफेक करण्यास सुरुवात केली. पोलीस कमी आणि जमाव जास्त अशी अवस्था असल्याने जमाव पोलिसांवर भारी पडला. दगडफेकीत एक कर्मचारी जखमी झाला तर पोलिसांच्या वाहनाच्या काचा फुटल्या. आक्रमक झालेल्या जमावपैकी काहींनी ट्रकची तोडफोड करीत आग लावली.
घटनास्थळी बराच काळ तणावाचे वातावरण निर्माण झाल्याने तातडीने अतिरिक्त कुमक मागविण्यात आली. काही वेळात जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राजकुमार, चाळीसगाव अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, चोपडा उपविभागीय पोलीस अधिकारी कृषीकेश रावले, जळगाव उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत, स्थानिक गुन्हे शाखा निरीक्षक किसनराव नजनपाटील, जिल्हापेठ निरीक्षक विशाल जैस्वाल, एरंडोल, पारोळा पोलीस निरीक्षक आणि आरसीपी पथकासह पोहचले.
एलसीबीच्या पथकाने लागलीच माहिती घेत संशयितांची धरपकड सुरू केली. सुरुवातीला तिघांना ताब्यात घेतल्यावर त्यांनी आणखी काही तरुणांची नावे सांगितली. पोलिसांनी रात्री उशिरापर्यंत १२ जणांना ताब्यात घेतले होते. जैन इरिगेशनच्या अग्निशमन बंबाच्या मदतीने ट्रकची आग आटोक्यात आणण्यात आली. ट्रकमध्ये असलेले लहान सिलेंडर वेळीच बाहेर काढले आणि डिझेल टँक जवळील आग विझविल्याने मोठा अनर्थ टळला. पोलीस पथक पहाटेपर्यंत घटनास्थळी थांबून होते. याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.