गुन्हेजळगांव

गणपती हॉस्पिटलच्या संचालकांना मोठा झटका, ५० लाखांच्या दंडासह कारावासाची शिक्षा

खान्देश टाइम्स न्यूज । २१ ऑगस्ट २०२३ । जळगाव शहरातील आकाशवाणी चौकात असलेल्या गणपती हॉस्पीटलचे (Ganpati Hospital) संचालक डॉ.शीतल स्वरुपचंद ओसवाल यांना न्यायालयाने मोठा झटका दिला आहे. धनादेश अनादरप्रकरणी न्यायालयाने त्यांना ५० लाखांचा दंड आणि एक वर्षाचा तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. न्यायमुर्ती जान्हवी केळवर यांच्या न्यायालयाने ही शिक्षा सुनावली आहे. जिल्ह्यात या कारवाईने मोठी खळबळ उडाली आहे.

जळगाव शहरातील आकाशवाणी चौकात डॉ.शीतल ओसवाल यांचे हॉस्पिटल आहे. डॉ.ओसवाल यांच्या हॉस्पिटलमध्ये अनिल तोताराम शिरसाळे व त्यांच्या पत्नी २००२ पासून लॅब टेक्निशयन म्हणून सेवा देत होते. वर्षानुवर्षे दिलेल्या सेवेपोटी या दांपत्याला वेतनापोटी डॉ.ओसवाल यांनी ५५ लाखांचे धनादेश दिले होते. तसेच धनादेश दिल्याबाबत पत्रही दिले होते.

दिलेल्या धनादेश पैकी दहा लाखांचा एक धनादेश वटला होता. तर अन्य दहा लाखांचे दोन व पाच लाखांचा एक धनादेश वटलेला नव्हता. त्यामुळे शिरसाळे यांनी न्यायालयात धाव घेतली आणि धनादेश अनादरप्रकरणी पुरावे सादर केले. त्यानुसार प्रथम वर्ग न्या. जान्हवी केळकर यांच्यासमोर तीनही खटल्याचे कामकाज चालले.

न्यायालयात साक्षी पुराव्यानंतर डॉ.ओसवाल दोषी ठरल्याने तीनही खटल्यात त्यांना ५० लाख दंडासह १ वर्ष तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली आहे. शिरसाळे यांच्यावतीने ॲड.आर.आर.गिरनारे व ॲड. हेमंत गिरनारे यांनी काम पाहिले. न्यायालयाच्या निर्णयाने जिल्ह्यात डॉक्टर आणि इतर व्यापारी वर्गात मोठी खळबळ उडाली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button