सामाजिक

उद्योगक्षेत्रातील अतुलनीय कामगिरीबद्दल श्री. अशोक जैन यांचा एबीपी माझाच्या ‘माझा सन्मान’ पुरस्काराने गौरव

मुंबई l २२ ऑगस्ट २०२३ l महाराष्ट्रासह देशभर प्रतिष्ठीत असलेला, एबीपी न्यूज नेटवर्कच्या एबीपी माझा या मराठी वृत्तवाहिनीतर्फे दिला जाणारा ‘माझा सन्मान-२०२३’ या पुरस्काराने उद्योग क्षेत्रातील अतुलनीय कामगिरीबद्दल जैन इरिगेशन सिस्टिम्स लि. कंपनीचे अध्यक्ष श्री. अशोक जैन यांचा गौरव करण्यात आला.
महाराष्ट्राचे मानबिंदू असलेल्या मंडळींचा माझा सन्मान सोहळा मुंबईच्या परळ येथील हॉटेल आयटीसी ग्रँड सेंट्रल येथे सोमवारी संपन्न झाला. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे, मनसे चे अध्यक्ष राज ठाकरे , जेष्ठ सिने अभिनेते जितेंद्र यांच्याहस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी एबीपी माझाचे मुख्य संपादक राजीव खांडेकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. माझा सन्मान पुरस्काराचे यंदाचे १५ वे वर्ष आहे. सामाजिक, मनोरंजन, कला, लोककला, समाजकार्य, विज्ञान, उद्योग अशा विविध क्षेत्रातील दिग्गजांना ‘माझा सन्मान’ प्रदान करण्यात येतो. यंदाही महाराष्ट्रासह देशातही ज्यांच्या कार्याची दखल घेतली जात आहे अश्या व्यक्तीमत्वांना ‘माझा सन्मान’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

जैन इरिगेशन कंपनीची सहा दशकांपूर्वी ७००० रुपयांच्या बीज भांडवलातून सुरुवात झाली. आज जवळपास ७९०० कोटींच्या वार्षिक उलाढालीचा आलेख कंपनीने उंचावला आहे. जगभरात 33 कारखाने, १45 हून अधिक देशात निर्यात, 11000 च्यावर सहकारी ही कंपनीची बलस्थानं आहेत. यातूनच लाखो शेतकऱ्यांच्या जीवनमानात सर्वांगीण बदल कंपनीने घडवले. पाणी बचतीसह, शेत, शेतकरी यांचा विकास हेच जीवन-लक्ष्य केंद्रस्थानी ठेवत कंपनी व्रतस्थपणे कार्य करीत आहे आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सामाजिक प्रतिष्ठा प्राप्त करून देण्यात मोलाची भूमिका जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. कंपनी निभावत आहे. या अतुलनीय कामागिरीला अधोरेखित करत श्री. अशोक जैन यांना सन्मानीत करण्यात आले.

यावर्षी श्री. अशोक जैन यांच्यासोबत अमेरिकेतील मिशिगन राज्याचे खासदार श्रीनिवास ठाणेदार, जेष्ठ गायक सुरेश वाडकर, जेष्ठ लेखक अशोक पत्की, सिने अभिनेत्री श्रद्धा कपूर, सिने-नाट्य दिग्दर्शक केदार शिंदे, कीर्तनकार सत्यपाल महाराज, ज्येष्ठ संशोधक सुरेश वाघे , दत्तात्रय वारे गुरुजो, क्रिकेटपटू शार्दूल ठाकूर, यांनाही सन्मानित करण्यात आले.

हा पुरस्कार माझ्या शेतकरी बांधवांना, सहकाऱ्यांना अर्पण – अशोक जैन

१२८ वर्षांपूर्वी आमचे पूर्वज राजस्थान येथून पाण्याच्या शोधात महाराष्ट्रात जळगाव जिल्ह्यातील अजिंठ्याच्या पायथ्याशी असलेल्या शेवटच्या गावी वाकोदला आले आणि योगा योग म्हणा की, पाण्याच्या शोधात आलो आणि पाण्यामध्ये आम्ही आज काम करतो आहे. पाण्यामध्ये काम करत असताना शेती आणि शेतकरी हेच आमचे जीवन राहिले आहे. शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू यायला पाहिजे यासाठी राबणे हे आमच्या सर्वांचे कर्तव्य आहे. हा पुरस्कार एबीपी माझाने एका ग्रामीण भागातून आलेल्या उद्योजकाला दिला त्याबद्दल मी एबीपी माझा, राजीव खांडेकरजी व सर्व सहकाऱ्यांचे मी धन्यवाद व्यक्त करतो.

हा पुरस्कार मी सर्व शेतकरी बांधव व कंपनीतील ११ हजार सहकाऱ्यांना अर्पण करतो. ११ हजार सहकाऱ्यांपैकी ९ हजार सहकारी हे आपले मराठी बांधव आहेत. मराठी बांधवांच्यासाथीने हा पुरस्कार मिळाला याचा आनंद आहे. ‘‘महाराष्ट्र हा विद्येचा, संस्कृतिचा, उद्योगाचा अन कृषिवैभवाचा! आपण सर्व मिळून निर्धार करू या जग जिंकण्याचा…’’ अशी प्रतिक्रिया जैन इरिगेशन सिस्टिम्स् लिमिटेडचे अध्यक्ष अशोक जैन यांनी व्यक्त केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button