शासकीयजळगांव

जल जीवन मिशनमध्ये राज्यात जळगाव जिल्हा नंबर १

१४९२ गावांमधील ६ लाख ८० हजार घरांना पोहचले नळाद्वारे स्वच्छ जल

जळगाव l ३० ऑगस्ट २०२३ l जल जीवन मिशनमध्ये देशपातळीवर घेण्यात आलेल्या सर्वेक्षणात जळगाव जिल्ह्याने ६३.६१ टक्के गुण प्राप्त करत राज्यात प्रथम क्रमांकावर झेप घेतली आहे. तर देशात ६१ वा क्रमांक आला आहे. जल जीवन मिशनच्या माध्यमातून जिल्ह्यातील १४९२ गावांमधील ६ लाख ८० घरांमध्ये नळाद्वारे स्वच्छ पाणी पोहचले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या‌ ‘ हर घर नल हे जल’ संकल्पनेतून साकार झालेल्या जलजीवन मिशनने जिल्ह्यात पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आकार घेतला आहे. जिल्ह्यात महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागामार्फत एकूण २६ योजना राबविल्या जात असून त्यासाठी ५२६ कोटी ५६ लाख रूपये खर्च करण्यात येत आहेत. जळगाव जिल्हा परिषदेतर्फे १४०० योजना राबविल्या जात असून १ हजार २३९ कोटी रूपये निधी उपलब्ध करण्यात आला आहे.

जलजीवन मिशन सर्वेक्षण २०२३ मध्ये गुणांकन देतांना भौतिक प्रगती ज्यामध्ये घरांना नळाद्वारे होणारा पाणीपुरवठा, पाणी गुणवत्ता तपासणी तसेच पाणीपुरवठा स्त्रोतांची एफटीके कीटद्वारे होणारी तपासणी तसेच प्रयोगशाळात होणारी पाण्याच्या गुणवत्तेची तपासणी‌‌ यासाठी गुण दिले जातात. तसेच संस्थात्मक रचना यामध्ये पूर्ण होणाऱ्या योजना गावांना हस्तांतरित करणे तसेच कौशल्य प्रशिक्षण या बाबींच्या आधारे ही गुणांकन होत असते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने देशभरात जलजीवन मिशन ही योजना अंमलात आली आहे. या अंतर्गत २०२४ पर्यंत देशातील प्रत्येक घरापर्यंत नवीन निकषानुसार पिण्याचे शुध्द पाणी पोहचवण्यात येणार आहे. जिल्ह्यात या योजनेतून अगदी वाडी-वस्त्या आणि दुर्गम भागापर्यंत शुध्द पेयजल पोहचवण्याचा संकल्प करण्यात आलेला आहे.

जलजीवन सर्वेक्षण-२०२३ अंतर्गत जलजीवन मिशनच्या अंतर्गत चमकदार कामगिरी करणार्‍या जिल्ह्यांची रँकींग जाहीर करण्यात आली आहे. यात जळगाव जिल्हा हा राज्यातून पहिला तर देशातून ६१व्या क्रमांकावर आलेला आहे. लक्षणीय बाब म्हणजे या यादीत १९९ जिल्ह्यांना नामांकीत करण्यात आले असून यात जळगावला हे स्थान मिळाले आहे.

जलजीवन मिशनमध्ये जळगाव जिल्ह्याला अग्रस्थानावर आणण्यासाठी पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अंकीत, पाणी पुरवठा खात्याचे अभियंते व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button