जळगाव l ५ सप्टेंबर २०२३ l विविध क्षेत्रात अतिउत्कृष्ट कार्य करणार्या माजी सैनिक व त्यांच्या पत्नी आणि पाल्यांना विशेष पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. या पुरस्कारासाठी पात्र असणार्यांनी २० सप्टेंबरपर्यंत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय येथे अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
राष्ट्रीय व आंतराष्ट्रीय पातळीवरील पुरस्कार प्राप्त खेळाडू, साहित्य, संगीत, गायन, वादन, नृत्य इत्यादी क्षेत्रातील पुरस्कार विजेते, यशस्वी उद्योजक, सामाजिक क्षेत्रात विशिष्ट कार्य, योगदान दिल्याबद्दलचा पुरस्कार मिळविणारे, संगणक क्षेत्रात अतिउत्कृष्ट कामगिरी करणारे, पुर, जळीत, दरोडा अपघात आणि इतर नैसर्गिक आपत्तीमध्ये बहुमोल कामगिरी करणारे माजी सैनिक, पत्नी आणि पाल्यांना या कार्याबद्दल एकरकमी १० हजार रुपये व आंतरराष्ट्रीय स्तरासाठी २५ हजार रुपयांचा पुरस्कार सैनिक कल्याण विभागामार्फत दिला जाणार आहे.
तसेच दहावी आणि बारावीच्या परिक्षेत ९० टक्के व त्यापेक्षा जास्त गुण मिळवून उत्तीर्ण होणार्या माजी सैनिक, विधवांच्या पाच पाल्यांना विभागीय पातळीवर दहा हजार रुपयांचा विशेष गौरव पुरस्कार वितरण करण्यात येणार आहे. यासाठी पात्र असणार्यांनी कागदपत्रांसह अर्ज २० सप्टेंबरपर्यंत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, जळगाव येथे सादर करावे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त पात्र माजी सैनिक, विधवा यांच्या पाल्यांनी याचा लाभ घ्यावा. असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे.