खान्देश टाइम्स न्यूज | २२ जून २०२३ | शेतकऱ्यावर मोटार चोरीचा संशय व्यक्त केल्याने त्या प्रकरणात गुन्हा दाखल न करण्याच्या मोबदल्यात सहा हजारांची लाच स्वीकारणार्या भुसावळ तालुका पोलीस ठाण्यातील हवालदाराला जळगाव एसीबीने आज सकाळी मांडवेदिगर फाट्याजवळ रंगेहाथ पकडले. गणेश पोपटराव गव्हाळे (जामनेर) असे हवालदाराचे नाव आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार कुर्हेपानाचे परीसरातील 35 वर्षीय शेतकरी असून त्यांच्यासह अन्य दोन शेतकर्यांच्या शेतात इलेक्ट्रीक मोटार होती. एका शेतकर्याची पाच हजार रुपये किंमतीची मोटार नुकतीच चोरीला गेली होती. यानंतर कुर्हे बीटचे हवालदार गव्हाळे यांनी शेतकर्याच्या तोंडी तक्रारीवरून तक्रारदार असलेल्या शेतकर्याशी संवाद साधून संबंधित शेतकर्यांचा तुमच्यावर मोटार चोरीचा आरोप असून प्रकरण मिटवण्यासाठी मला एक हजारांची व मोटार चोरीपोटी पाच हजार रुपये संबंधिताना देण्याची मागणी केली. तक्रारदाराने याबाबत एसीबीकडे बुधवारी तक्रार दिल्यानंतर लागलीच लाच पडताळणी करण्यात आली.
हवालदार गव्हाळे यांची बुधवारी रात्र गस्त होती. सकाळी ड्युटी आटोपल्यानंतर साडेसात वाजेच्या सुमारास त्यांनी तक्रारदाराला लाच रक्कम देण्यासाठी मांडवा फाट्यावर बोलावले. शेतकर्याकडून सहा हजारांची लाच घेताच दबा धरून असलेल्या पथकाने गव्हाळे यांना अटक केली. या कारवाईनंतर पोलीस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे. गेल्या काही महिन्यात पोलिसांवर अनेक ट्रॅप झाले असून लाच घेताना पोलीस जाळ्यात अडकत आहेत.
जळगाव एसीबीचे प्रभारी पोलीस उपअधीक्षक अभिषेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजोग बच्छाव व सहकार्यांनी हा सापळा यशस्वी केला. पोलीस उपमहानिरीक्षक जळगावात येऊन जाताच ही कारवाई झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे.