पाचोरा :-तालुक्यातील घुसर्डी येथे ८ रोजी केळी लागवडीसाठी पावटी पाडत असतांना लागलेल्या विजेच्या धक्क्यामुळे एक २३ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे. पाचोरा पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
तरुण शेतकरी विकास धर्मा निकुंभ (वय – २३) रा. घुसर्डी ता. पाचोरा हे काका राजेंद्र निकुंभ, चुलत भाऊ साई व यश निकुंभ यांचे सोबत शेतात केळी लागवडीसाठी पावटी पाडण्याचे काम रविवारी करत होते. पावट्या सरळ पडाव्या यासाठी तारने ते आखणी करत असतांनाच पावटी पाडण्यासाठी जो तार वापरण्यात आला होता. तो तुटल्यामुळे सदर तार शेतातून गेलेल्या ११ के. व्ही. या गावठाणच्या लाईनवर गेल्याने त्यात विद्युतप्रवाह संचारला. त्यामुळे विकास धर्मा निकुंभ यांना जबर विजेचा धक्का बसला. ते शेताच्या बांधावर जाऊन बेशुद्ध पडले. सदर प्रकार काका व चुलतभाऊंच्या लक्षात येताच विकास यास तात्काळ कजगाव येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तपासले असता ते मृत झाल्याचे सांगितले. सदर घटना गावात कळताच रुग्णालय परिसरात मोठी गर्दी झाली होती. या दुर्दैवी घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे. विकास यांचे पश्चात आई, वडील, दोन भाऊ, काका, चुलत भाऊ असा परिवार आहे. पाचोरा पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.