जळगांव:-जिल्ह्यातील हुशार परंतु आर्थिक दृष्ट्या अडचणीत असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुरेशदादा शैक्षणिक व उद्योजकता विकास योजनेच्या माध्यमातून उच्चशिक्षण शिष्यवृत्ती वितरणासोबत शिक्षण पुरक उपक्रमांचे आयोजन गेल्या पंधरा वर्षांपासून सुरु आहे. एसडी-सीड च्या अध्यक्षा सौ. रत्नाभाभी जैन व कार्याध्यक्षा मिनाक्षीताई जैन या योजनेच्या यशस्वीतेसाठी नेहमीच तत्पर असतात. विद्यार्थ्यांमध्ये विविध कौशल्य आत्मसात होण्याच्या दृष्टीने एसडी-सीडच्या माधमातून वर्षभरात विविध शाळा व महाविद्यालयांमध्ये कार्यशाळा तसेच शिबिरांचे आयोजन केले जात असते.
इयत्ता १० वी पासून विद्यार्थ्यांना खऱ्या अर्थाने आव्हानांना सामोरे जावे लागत असते. तसेच विविध परीक्षांच्या माध्यमातून मिळवलेल्या प्राविण्यानंतर विद्यार्थ्यांची शिक्षणाची पुढची दिशा ठरत असते. त्यामुळे विद्यार्थ्यांना परिक्षेत यश प्राप्त व्हावे व अभ्यासाचे नियोजन करता यावे यासाठी एसडी-सीड तर्फे “परीक्षेची पूर्व तयारी” या विषयावर कार्यशाळेचे आयोजन या.दे.पाटील माध्यमिक विद्यालय, जळगाव येथे करण्यात आले होते. कार्यशाळेसाठी श्री. अभिजित कुलकर्णी हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून लाभले होते. वाढत्या स्पर्धात्मक युगात विद्यार्थ्यांनी येणाऱ्या आव्हानांसाठी सदैव तत्पर राहावे व परीक्षा कोणत्याही प्रकारची असो तिला आत्मविश्वासाने सामोरे जाण्याचे आवाहन त्यांनी केले.
त्यांनी आपल्या मार्गदर्शनात खालील ठळक मुद्दे विद्यार्थ्यांना सांगितले.
• यात परीक्षेआधी विविध क्लुप्त्यांचा अभ्यास करून जाणे.
• आपण परीक्षा का व कश्यासाठी देत आहोत? यावर चिंतन करणे गरजेचे.
• परीक्षांचे स्तर व विविध परीक्षा पद्धती.
• अभ्यासाच्या पद्धती.
• लिहिण्याच्या कौशल्याचा विकास व वापर कसा करावा.
• आलेल्या प्रश्नांचे योग्य आकलन कसे करावे?
या ठळक मुद्यांचा अभ्यास अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर सोनेरी भविष्याची स्वप्न पाहणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याने परीक्षांना गंभीरपणे सामोरे जाणे आवश्यक आहे परंतु त्याचा बाऊ होता कामा नये हे सुद्धा तेवढेच महत्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. परीक्षेत काही कारणास्तव अपयश मिळाले तर ते पचविण्याची क्षमता ही विद्यार्थ्यांनी स्वत:मध्ये विकसित करावी व पुन्हा जोमाने प्रयत्न करून यश संपादन करावे असेही सांगितले. तद्नंतर एसडी-सीड समन्वयक विरभूषण पाटील यांनी एसडी-सीडच्या विद्यार्थी विकासाच्या विविध योजनांची माहिती विद्यार्थ्यांना दिली तसेच परीक्षेला सामोरे जातांना काही महत्वाचे मुद्दे विद्यार्थ्यांनी लक्ष्यात घेण्यासाठी मार्गदर्शन केले.
कार्यशाळेला विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. संजय खंबायत, उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभार प्रदर्शन सौ. वर्षा आहिरराव यांनी केले. हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी विद्यालयाचे प्राचार्य व व्यवस्थापन यांच्या बद्दल एसडी-सीड गव्हर्निग बोर्ड चेअरमन डॉ. प्रसन्नकुमार रेदासनी यांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे.