खान्देश टाइम्स न्यूज l २६ जून २०२३ l कमी कापूस भाव, जिल्ह्यातील ठप्प पडलेली विकास कामे, पाणी टंचाई, बिघडलेली कायदा सुव्यवस्था सह आदी विषयांवरून राष्ट्रवादी काँग्रेस उद्या दि.२७ रोजी मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवणार आहे.
राज्यात कापुस उत्पादक शेतकऱ्यांना भाव मिळत नसल्याने अजूनही शेतकर्यांच्या घरात कापुस पडून आहे, जिल्ह्यातील अनेक विकास कामे प्रलंबित अवस्थेत आहे. मंजूर प्रकल्प अन्यत्र पळविले जात आहे, जिल्ह्यात अनेक गावांमध्ये भिषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे तरी सरकार त्या गावांच्या पाणी टंचाई संदर्भात कुठलेही पावले उचलत नाही.
जिल्ह्यात सर्वत्र अवैध धंदे खुलेआम सुरू आहे, खुन, दरोडे दिवसा होत आहे गुटका, गांजा, देशी कट्टे, अवैध दारू खुलेआम विकला जात आहे या बद्दल वारंवार तक्रारी करून ही सरकार कुठलीही कार्यवाही न करता निष्क्रीय असुन जिल्ह्यातील जनता बेजार व हताश झाली आहे. शेतकर्यांना वादळ, अवकाळी पावसांची नुकसान भरपाई अजून मिळालेली नाही आणि दुसरीकडे हे इव्हेंटबाज सरकार फक्त पोकळ जाहीराती करून जनतेचा पैसा उडवत आहे. या इव्हेंटबाज सरकारचे लक्ष वेधण्यासाठी उद्या दि.२७ जून रोजी मुख्यमंत्री जळगाव येथे येत असल्यामुळे मुख्यमंत्र्यांचे या सर्व समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी जिल्हा राष्ट्रवादी कॅाग्रेस तर्फे उद्या काळे झेंडे दाखविले जाणार असल्याचे महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी यांनी कळविले आहे.
कुंभकर्णी झोपेत असलेल्या या सरकारला जागे करण्यासाठी जिल्ह्यातील राष्ट्रवादी कॅाग्रेसच्या सर्व आजी माजी आमदार, प्रदेश, जिल्हा पदाधिकारी, जिल्हा परीषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सभापती, नगरसेवक, नगरअध्यक्ष, मार्केट कमीटी सदस्य, सभापती, तालुका अध्यक्ष व पदाधिकारी, युवक, महिला व सर्व आघाड्यांचे पदाधिकारी, विवीध शाखांचे अध्यक्ष पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने दि. २७ जून मंगळवार रोजी दुपारी १ वाजेला आकाशवाणी चौकातील राष्ट्रवादी पक्षाच्या जिल्हा कार्यालयासमोर जमावे असे आवाहन राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष रविंद्र भैय्या पाटील व महानगर अध्यक्ष अशोक लाडवंजारी यांनी केले आहे.