खान्देशजळगांवशासकीय

मृत्यूच्या दाढेतून मिळाले तीन महिलांना जीवदान, गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया यशस्वी

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालयाच्या वैद्यकीय पथकाचे यश

जळगाव (प्रतिनिधी) : गर्भपिशवीसंदर्भात गंभीर आजार असलेल्या दोन महिलांना शर्थीचे प्रयत्न करून व गुंतागुंतीची शस्त्रक्रिया करून वाचविण्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या स्त्री रोग व प्रसूती शास्त्र विभागाला पथकाला यश आले. तसेच, एका गरोदर महिला अतिरक्तस्राव झाल्याने व गर्भपिशवी फाटल्याने व बाळ पिशवीच्या बाहेर असल्यामुळे गंभीर झालेली होती. तिलादेखील वाचविण्यात डॉक्टर यशस्वी झाले. याबद्दल अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांनी त्यांचे कौतुक केले.

जामनेर येथील रहिवासी असलेली गरोदर महिला उपचारासाठी मध्यरात्रीच्या सुमारास अत्यवस्थ स्थितीत प्रसूतीगृहात दाखल झाली.या महिलेची या पूर्वी सीझेरीयनची शस्त्रक्रिया झालेली होती. या महिलेच्या विविध वैद्यकीय चाचण्या केल्या असता तिच्या पोटात रक्तस्राव होत असल्याचे दिसत होते. त्यामुळे तत्काळ शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला. शस्त्रक्रिया करताना पोटामध्ये गर्भपिशवी फाटून त्यातील बाळ हे गर्भ पिशवी बाहेर असल्याचे आढळले. तसेच पोटामध्ये २ लीटर रक्त आढळले.गर्भ पिशवी न काढता महिलेवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. रुग्णांस पाच रक्ताच्या पिशव्या लावण्यात आल्या. उपचारांती महिलेची प्रकृती आता स्थिर आहे.

दुसऱ्या घटनेत धरणगाव येथील महिला रक्तस्त्राव होत असल्याकारणाने स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र विभागात दाखल झाली. तपासणीअंती गर्भपिशवी मध्ये २ लिटर आकाराचा गोळा दिसत होता. गर्भपिशवी ही काळी-निळी झाली होती.औषधोपचारानंतरदेखील ती आकुंचन पावत नव्हती. त्यामुळे गर्भ पिशवी बांधण्यात आली. तसेच तिच्या मोठ्या रक्तवाहिन्या बांधण्यात आल्या. त्यानंतर रक्तस्त्राव थांबला. महिलेची गर्भ पिशवी वाचवण्यात यश आले. महिला रुग्णाला सहा रक्ताच्या व पेशीच्या पिशव्या लावण्यात आल्या.

तिसऱ्या घटनेमध्ये जामनेर तालुक्यातील पाळधी येथील महिलेच्या पोटात वार ही गर्भपिशवीच्या मुखाजवळ असून ती पूर्णपणे चिटकलेली होती. तसेच वारेचा काही भाग हा मूत्र पिशवीला चिकटलेला होता.डॉक्टरांनी गर्भ पिशवी चिटकलेल्या वारेसहित काढून टाकली. तसेच मूत्र पिशवीवरही शस्त्रक्रिया करण्यात आली. रुग्णांला पाच रक्ताच्या पिशव्या लावण्यात आल्या. त्यामुळे यादेखील महिलेचा जीव वाचला आहे. हे तिन्ही महिला रूग्ण अत्यंत गरीब असून मोल मजुरी करून कुटुंबीयांचा उदरनिर्वाह करतात. महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत या शस्त्रक्रिया मोफत करण्यात आल्या. रूग्ण व नातेवाईकांनी वैद्यकीय पथकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.

स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. संजय बनसोडे यांनी ह्या शस्त्रक्रिया केल्या. शस्त्रक्रिया करण्याकामी सहायक प्राध्यापिका डॉ. मिताली गोलेच्छा, डॉ. राहुल कातकाडे, डॉ. प्रतीक्षा देशमुख, डॉ. बसवराज होन्ना, डॉ. प्रगती राखोंडे, डॉ. अमृता दुधेकर, डॉ. पूजा वाघमारे, डॉ. पूजा बुजाडे, डॉ. वैष्णवी नीलवर्ण, बधिरीकरण शास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. सुरेखा चव्हाण, डॉ. सुभेदार, डॉ. उमेश देशमुख यांच्यासह तुळसा माळी यांचे सहकार्य लाभले. अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांच्या हस्ते सर्व रुग्णांना औषधी देऊन रुग्णालयातून निरोप देण्यात आला. यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय गायकवाड उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button