खान्देश टाइम्स न्यूज | २९ जून २०२३ | जळगाव जिल्ह्याला सुन्न करणारी बातमी आषाढी एकादशीच्या दिवशी घडली आहे. गुरुवारी रात्री ९.३० वाजेच्या सुमारास कासोदा ते एरंडोल रस्त्यावर पोलिसांच्या वाहनाचा अपघात झाला असून एक अधिकाऱ्यासह कर्मचारी जागीच ठार झाले आहेत. अपघातात तिघे जखमी झाले असून त्यांना जळगाव हलविण्यात आले आहे.
आर्थिक गुन्हे शाखेतील अधिकारी आणि कर्मचारी शुक्रवारी रात्री ९.३० वाजेच्या सुमारास शासकीय वाहनाने कासोदाकडून एरंडोलकडे येत होते. अंजनी धरणाच्या जवळपास वैष्णवी रसवंतीजवळ अचानक एक मोठा चिंचेचा वृक्ष वाहनावर कोसळला. अपघात इतका भीषण होता की त्यात सहाय्यक निरीक्षक सुदर्शन दातीर आणि चालक अजय चौधरी हे जागीच ठार झाले.
अपघातात आणखी तिघे कर्मचारी जखमी झाले असून त्यांना उपचारार्थ लागलीच जळगाव हलविण्यात आले आहे. आषाढी एकादशीच्या दिवशी घडलेल्या घटनेने पोलीस दलासह जिल्हा सुन्न झाला आहे. अपघातात निलेश सूर्यवंशी, चंद्रकांत शिंदे, भरत जठारे हे जखमी झाले आहेत.