लोक अदालत पूर्व तयारीसाठी जिल्हाधिकारी व विधी सेवा प्राधिकरण सचिव यांची आढावा बैठक संपन्न

लोक अदालत पूर्व तयारीसाठी जिल्हाधिकारी व विधी सेवा प्राधिकरण सचिव यांची आढावा बैठक संपन्न
जळगाव प्रतिनिधी l जळगाव जिल्ह्यात लवकरच होणाऱ्या लोक अदालतच्या प्रभावी आयोजनासाठी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव यांच्यासोबत आढावा बैठक घेतली. या बैठकीत लोक अदालतीच्या तयारीसंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली.
यावेळी जिल्हाधिकारी यांनी न्यायालयीन प्रलंबित प्रकरणांची प्रभावी सोडवणूक करण्यावर भर दिला. जास्तीत जास्त प्रकरणांचा निपटारा लोक अदालतमध्ये करण्यात यावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. विविध विभागांमधील समन्वय साधण्यावरही चर्चा झाली. महसूल, पोलीस, बँका, वीज वितरण कंपन्या, विमा कंपन्या, नगरपालिका आदी विभागांच्या सहभागाने प्रकरणे सोडवण्याचा नियोजनात्मक दृष्टिकोन बैठकीत मांडण्यात आला.
या वेळी बोलताना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद म्हणाले, “लोक अदालत म्हणजे सामान्य नागरिकांना न्याय मिळवून देणारा एक प्रभावी मार्ग आहे. प्रशासन आणि न्याय व्यवस्था एकत्र येऊन हे कार्य अधिक प्रभावी करू शकतात.”
लोक अदालतच्या माध्यमातून वाद विनाखर्च, विनातक्रार आणि जलद मार्गाने सुटतात, हे नागरिकांपर्यंत पोहचवण्यासाठी जनजागृती मोहिम राबवण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. तसेच, पात्र प्रकरणांची पूर्व छाननी करून सूची तयार करण्याचे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित यंत्रणांना दिले.
जिल्हा प्रशासन आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या संयुक्त सहकार्याने येत्या लोक अदालतमध्ये अधिकाधिक प्रकरणांचा निपटारा करून नागरिकांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.