खान्देश टाइम्स न्यूज | १ जुलाई २०२३ | जळगाव जिल्ह्यात आणि विशेषतः शहरात वाळू माफियांनी हैदोस घातला आहे. वाळू माफियांचे महसूली अधिकारी आणि कर्मचाऱ्यांशी असलेले संबंध देखील काही लपून नाही. अनेकदा तर महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांवर हफ्तेखोरीचे देखील झाले आहेत. सध्या एक चर्चा जोरदार रंगत असून नुकतेच बदली झालेल्या एका महसूल कर्मचाऱ्यामध्ये आणि वाळू माफियांमध्ये पैशांच्या देवाण-घेवाण वरून वाद झाल्याची चर्चा रंगत आहे.
वाळू माफियांना महसूल विभागाकडून नेहमीच अभय दिले जाते. शहरातून दररोज मोठ्या संख्येने अवैध वाळू वाहतूक आणि वाळू चोरी होत असताना देखील कधी तरीच कारवाई केली जाते. मध्यंतरी तर माहिती अधिकार कार्यकर्ते दीपककुमार गुप्ता यांनी अनेक गंभीर आरोप देखील केले होते. महसुलात कार्यरत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे संबंध लक्षात घेता अनेकांनी वाळूत चांगलेच हात साफ करून घेतले आहे.
वाळू कलेक्शनच्या मुद्द्यावरून नुकतेच ‘सुपर’ सोनवणे आणि आणखी एका ‘बाळ’कात एका हॉटेलमध्ये मध्यरात्री नंतर जोरदार वाद झाला. वाळू माफियांचा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात बिनधास्त वापर असल्याचे अनेकदा पाहण्यात आले आहे. दरम्यान, काही दिवसापूर्वी काही वाळू वाहतूकदारांनी एका शाखेत प्रवेश केला. अप्पर साहेबांनी हा प्रकार सीसीटिव्ही कॅमेऱ्यात पाहिल्यावर त्यांनी ‘त्या’ कर्मचाऱ्याची चांगलीच खरडपट्टी काढल्याची चर्चा आहे.