गुन्हेजळगांव

मोठी बातमी : २ हजाराची लाच भोवली, जिल्हा कारागृहाचे ३ कर्मचारी रंगेहाथ

खान्देश टाईम्स न्यूज | ८ नोव्हेंबर २०२३ | जळगाव जिल्हा कारागृहातील सुभेदार भिमा उखडु भिल तसेच महिला कर्मचारी पूजा सोनवणे व हेमलता गयबु पाटील यांना तक्रारदार यांचेकडून हजाराची लाचेची मागणी करुन लाचेची रक्कम महिला कारागृह पोलीस हेमलता पाटील यांचे हस्ते स्विकारताना रंगेहाथ पकडण्यात आले. जिल्हा कारागृहात झालेल्या या कारवाईने मोठी खळबळ उडाली आहे.

तक्रारदार या एकात्मिक बालविकास सेवा योजना अंतर्गत असलेल्या पहुर येथील अंगणवाडीत अंगणवाडी शिक्षिका म्हणुन कार्यरत असून त्यांच्या मुलाविरुद्ध जिल्हापेठ पो.स्टे. जळगांव, येथे भा. द. वि. कलम ३०७ प्रमाणे गुन्हा दाखल असून सदर गुन्हयांत त्यास अटक करण्यात येवून तो सध्या जिल्हा कारागृह, जळगांव येथे न्यायालयीन कोठडीत आहे.

तक्रारदार त्याचे मुलास वेळोवेळी भेटण्याकरीता, जिल्हा कारागृह, जळगाव येथे गेले असता तेव्हा तेथे ड्युटीवर असलेले सुभेदार भिमा भिल, कारागृह पोलीस पुजा सोनवणे, हेमलता पाटील, अनंत केंद्रेकर व परशुराम काळे तसेच वेळोवेळी ड्युटीवरील इतर कर्मचारी हे त्याचेकडून त्यांच्या मुलाची भेट घडवून आणण्यासाठी प्रत्येक वेळी २ हजार रुपये मागणी करीत होते. तक्रारदार यांची त्यांना पैसे देण्या इतकी आर्थिक परिस्थिती सक्षम नसल्याने तक्रारदार यांनी दि.७ रोजी त्याचेविरुध्द कारवाई होणेकरीता, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, धुळे यांचेकडे लेखी तक्रार दिली होती.

तक्रारीच्या अनुषंगाने जिल्हा कारागृह, जळगांव येथे जावून पडताळणी केली असता पडताळणी दरम्यान महिला कारागृह पोलीस पुजा सोनवणे व हेमलता पाटील यांनी तक्रारदार यांचेकडे त्यांच्या मुलाची कारागृहात भेट करुन देण्यासाठी २ हजार लाचेची मागणी करून भिमा उखडु भिल, सुभेदार यांनी तक्रारदार यांना सदर लाचेची रक्कम महिला कारागृह पोलीस हेमलता पाटील यांच्याकडे देण्यास सांगून महिला कारागृह पोलीस हेमलता पाटील यांनी सदर लाचेची रक्कम स्विकारताना त्यांना रंगेहात पकडण्यात आले. तिघांविरुद्ध जिल्हापेठ पो.स्टे जि.धुळे येथे भ्रष्टाचार प्रतिबंध कलमान्वये गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.

सदरची कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक धुळे विभागाचे पोलीस उप अधीक्षक अभिषेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रुपाली खांडवी तसेच पथकातील राजन कदम, मुकेश अहिरे, रामदास बारेला, संतोष पावरा, मकरंद पाटील, प्रशांत बागुल, प्रविण मोरे, प्रविण पाटील, सुधीर मोरे या पथकाने केली आहे.

सदर कारवाईस नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर, अपर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी व वाचक पोलीस अधीक्षक मा. नरेंद्र पवार यांचे मार्गदर्शन लाभले आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास सुरु आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button