नाशिक जिल्ह्यातील घुगे दाम्पत्य ठरलं मानाचे वारकरी
पंढरपूर ;- कार्तिकी एकादशी निमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकिय महापूजा राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते संपन्न झाली आहे.
तर, यंदाचे मानाचे वारकरी म्हणून नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील माळेदुमाला गावातील बबन विठोबा घुगे आणि वत्सला बबन घुगे यांना पुजेचा मान मिळाला आहे. गेल्या 15 वर्षांपासून ते न चुकता वारी करतायत.
दरवर्षीप्रमाणे यंदाही कार्तिकी एकादशी मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. तसेच, अनेक वर्षांच्या प्रथेप्रमाणे कार्तिकी एकादशी निमित्त आज पहाटे राज्याच्या उपमुख्यमंत्री आणि त्यांच्या पत्नीच्या हस्ते महापूजा करण्यात आली. त्यामुळे, या पूजेसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांची पत्नी अमृता फडणवीस एकदिवसीय आधीच म्हणजे बुधवारीच पंढरपूरात दाखल झाले होते. दरम्यान, देवेंद्र फडणवीस आणि अमृता यांच्या हस्ते विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापुजा संपन्न झाली. यावेळी श्री. विठ्ठलाच्या मूर्तीला अभिषेक घालण्यात आला, आणि त्यानंतर मंत्रोपचारामध्ये देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते सपत्निक पूजा करण्यात आली. तर, यावेळी नाशिक जिल्ह्यातील बबन विठोबा घुगे आणि वत्सला बबन घुगे यांना उपमुख्यमंत्र्यांबरोबर विठ्ठलाची पुजा करण्याचा मान मिळाला आहे. या पूजेनंतर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीतर्फे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अमृता फडणवीस आणि मानाचे वारकरी घुगे दाम्पत यांचा सत्कार करण्यात आला.
कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात मोठ्या प्रमाणात सजावट करण्यात आली आहे. तसेच, कार्तिकीला येणाऱ्या लाखो भाविकांच्या स्वागतासाठी विठ्ठल मंदिर प्रशासनाकडून आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, विठ्ठल मंदिरात करण्यात आलेल्या सजावटीसाठी पुणे येथील भाविक राम जांभूळकर यांनी 5 टन फुलं दिली आहेत. ज्यात एकूण 22 प्रकारच्या पाना फुलांचा वापर करण्यात आले असून, यासाठी तीन दिवसांपासून 35 ते 40 कामगार काम करत होते.
राज्यात गाजत असलेल्या मराठा आरक्षणामुळे यंदाच्या कार्तिकी एकादशीच्या महापूजेला उपमुख्यमंत्र्यांनी येऊ नये अशी भूमिका मराठा बांधवांनी घेतली होती. सोबतच आपल्या मागण्यांसाठी कोळी समाजाने देखील उपमुख्यमंत्र्यांना विरोध केला होता. या सर्व पार्श्वभूमीवर स्थानिक प्रशासन आणि आंदोलकांमध्ये अनेक बैठका झाल्या. मात्र, आंदोलक आपल्या भूमिकेवर ठाम होते. शेवटी सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः हस्तक्षेप करत आंदोलकांची बैठक घेतली. आंदोलकांच्या मागण्या समजून घेतल्या. सोबतच त्यावर तोडगा काढण्याचा आश्वासन दिले. यासोबतच फडणवीसांशी मराठा समाजाची बैठक करण्याची आंदोलकांची मागणी देखील मान्य करण्यात आली. त्यामुळे, मराठा समाज बांधवांनी फडणवीसांना होणार विरोध मागे घेतला. मात्र, यासर्व घडामोडींमुळे यंदाच्या कार्तिकी एकादशीच्या महापूजेची मोठया प्रमाणात चर्चा झाली.