जळगाव ;- पोदार इंटरनॅशनल स्कुल जळगाव येथे थोर कवी, लेखक,समाजसुधारक तसेच प्रखर देशभक्त सुब्रमण्यम भारती यांची जयंती ‘भारतीय भाषा दिवस म्हणून साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाची सुरुवात परीपाठाच्या वेळी सकाळी ठीक ८:०० वाजता करण्यात आली. रूपरेषा व सूत्रसंचालन वीर शाह आणि आगम छाबडा या विद्यार्थ्यांनी केले.
शाळेचे प्राचार्य श्री गोकुळ महाजन व उपस्थित पालक प्रतिनिधी यांच्या हस्ते श्री शारदा स्तवन ,दीप प्रज्वलन तसेच महाकवी सुब्रमण्यम भारती यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.
ई.३ री च्या विद्यार्थ्यांनी सुब्रमण्यम भारती यांच्या जयंतीनिमित्त आयोजित ‘भाषा संगम’ या कार्यक्रमाच्या उपस्थितांना शुभेच्छा दिल्या. भारत आणि भाषा विविधता हे समीकरण जगजाहीर आहे .विद्यार्थ्यांना मातृभाषेसह इतर भाषेत रस निर्माण होवून भाषा प्रभुत्व प्राप्त करण्यासाठी पाठबळ मिळावे हा आयोजित कार्यक्रमाचा उद्देश होता.
शाळेचे हिंदी विभाग प्रमुख विनायक बेडसे यांनी कवी तथा स्वातंत्र्य सेनानी सुब्रमण्यम भारती यांचा जीवन परिचय उपस्थित विद्यार्थ्यांना करून दिला. नारी सन्मान यावर समृद्ध लेख आणि देशप्रेमाने ओतप्रोत कविता लिहून त्यांनी देशवासियांना स्वातंत्र्य संग्रामात सामील होण्याची प्रेरणा दिली म्हणून त्यांचा जन्मदिवस ११ डिसेंबर हा ‘‘भारतीय भाषा दिवस’ म्हणून साजरा करण्यात येतो अशी माहिती दिली.
याप्रसंगी शाळेच्या हिंदी विषय शिक्षिका सौ.मीनाक्षी राणे यांनी महाकवी सुब्रमण्यम भारती रचित ‘चमक राहा उत्तुंग हिमालय…. ही देशभक्तीपर कविता सादर केली.धर्म ,प्रांत ,भाषा ,वेशभूषा आणि संस्कृती जरी विविध असल्या तरी आम्ही भारतीय आहोत आणि सर्व भाषांचा सन्मान करतो ही भावना प्रकर्षाने जाणवली.
विद्यार्थ्यांनी पारंपारिक वेशभूषेसह हिंदी,मराठी,गुजराथी,तमिळ,पंजाबी आणि सिंधी अश्या विविध भाषेतील चारोळ्या प्रस्तुत केल्या तसेच बहारदार नृत्य सादर करून प्रेक्षकांची मने जिंकली.
यावेळी शाळेचे प्राचार्य श्री गोकुळ महाजन यांनी विद्यार्थ्यांना संबोधित केले. भाषिक विविधता असल्या तरी थोर समाजसुधारक आणि देशभक्तांच्या समर्पित प्रयत्नांमुळे राष्ट्रीय एकात्मता अबाधित आहे असे मत मांडले.विद्यार्थ्यांनी ऐकून ,बोलून वाचून आणि लिहून भाषा कौशल्य आत्मसात करावे असा आग्रह केला.यावेळी आपल्या भाषणातून त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना युनीसेफ स्थापना दिनाच्या देखील शुभेच्छा दिल्या.जगभरातील बालकांना पोषण व आरोग्य सेवा मिळावी या व्यापक उद्देशाने बालकांसाठी उभारण्यात आलेल्या आलेल्या संयुक्त राष्ट्र आंतरराष्ट्रीय आपत्कालीन निधी बद्दल माहिती दिली.प्रत्येक बालकाला मुलभूत हक्क मिळावा यासठी आपणही आपल्या परीने हातभार लावला पाहिजे असे आवाहन केले. उत्कृष्ठ सादरीकरणासाठी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
शाळेचे उपमुख्याध्यापक दिपक भावसार, शिक्षकवृंद तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांनी कार्यक्रमात प्रत्यक्ष उपस्थिती दर्शवली होती
राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.