धक्कादायक : संसद भवनात दोघांचा दांगडो ; स्मोक गॅस सोडल्याने गोंधळ
नवी दिल्ली ;- संसदेच्या सुरक्षेचा पुन्हा एकदा प्रश्न ऐरणीवर आला संसद भवनाच्या बाहेर दोन जणांनी फटाके फोडले. घोषणाबाजी केली. त्यानंतर हे दोघेही स्मोक गॅस घेऊन प्रेक्षक गॅलरीत येऊन तिथून हे दोघेही सभागृहात शिरले. त्यामुळे एकच गोंधळ उडाला.सुरक्षा रक्षकांनी दोघांना ताब्यात घेतले आहे.
कोणतीही परवानगी नसताना आणि सभागृहाचे सदस्य नसताना दोन जण आत शिरल्याने लोकसभेचं कामकाज काही काळासाठी स्थगित करण्यात आलं.
दोन जणांनी संसदेच्या बाहेर आधी फटाके फोडले. यावेळी त्यांनी भारतमाता की जय, तानाशाही नही चलेगी… आदी घोषणा दिल्या. ट्रान्स्पोर्ट भवनाच्या बाहेर हा गोंधळ घालण्यात आला. यावेळी त्यांनी पिवळ्या रंगाचा गॅसही फोडला. त्यामुळे संसद भवन परिसर पिवळा झाला होता. त्यानंतर हे दोघेही संसदेच्या प्रेक्षक गॅलरीत आले. यावेळी त्यांनी जोरजोरात घोषणा देत संसद सभागृहात प्रवेश केला.
अचानक दोन अज्ञात व्यक्ती संसदेच्या सभागृहात आल्याने एकच खळबळ उडाली. या दोघांना पकडण्यासाठी सुरक्षा रक्षक धावले. हे दोघेही सभागृहात इकडून तिकडे पळत होते. खासदारही या दोघांना पकडण्याचा प्रयत्न करत होते. त्यांच्या हातात टिअर गॅस होता. हा पिवळा गॅस घेऊन ते सभागृहात शिरले होते. त्यामुळे सर्वच जण धस्तावले होते. अखेर सुरक्षा रक्षकांनी या दोघांना जेरबंद केलं.
आमचं म्हणणं ऐकलं जात नाही. त्यामुळे आम्ही हे पाऊल उचलल्याचंत्यांनी मीडियाशी बोलताना सांगितलं. पोलिसांनी या महिलेला आणि पुरुषाला अटक केली असून त्यांना पार्लियामेंट स्ट्रीट पोलीस ठाण्यात नेलं आहे. त्यांची कसून चौकशी करण्यात येत आहे. हे लोक कशासाठी शिरले होते, कुणाच्या सांगण्यावरून आले होते, त्यांचा कुणाशी संबंध आहे, याची चौकशी केली जात आहे.
हा गोंधळ पाहून सर्व खासदार सभागृहाबाहेर पडले. यावेळी शिवसेनेच्या ठाकरे गटातील खासदार अरविंद सावंतही बाहेर आले आणि त्यांनी प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. सावंत यांनी सभागृहात घडलेल्या घटनेची माहिती देताना सांगितलं की, लोकसभेचं कामकाज सुरू असताना अचानक दोन जण प्रेक्षक गॅलरीतून सभागृहात आले. एका खांबाच्या मदतीने ते प्रेक्षक गॅलरीतून खाली आले. दोघांनी लागोपाठ उड्या मारल्या. मग दोघेही खासदारांच्या बाकांवरून उड्या मारत धावत होते. तेवढ्यात त्यातल्या एकाने बूट काढले, तो बूट काढत होता तेव्हा काही खासदारांनी त्याला घेरलं. त्याचप्रमाणे दुसऱ्या इसमालाही पकडलं. त्याचवेळी सभागृहात गॅस पसरू लागला. पिवळ्या रंगाचा गॅस दिसत होता. तो गॅस कसा आला ते माहिती नाही. पण या गॅसमुळे नाकाला आणि डोळ्यांना त्रास होत होता. सुरक्षारक्षकांनी या दोन्ही इसमांना ताब्यात घेतलं आहे.