अमळनेर : अल्पवयीन मुलीला धमकी देत चोपडा येथून पळवून अमळनेरला नेणाऱ्या दोन आरोपींना अमळनेर येथील जिल्हा व सत्र न्या. पी. आर. चौधरी यांनी सात वर्षांची शिक्षा सुनावली आहे. ही घटना दि. ६ नोव्हेंबर २०१९ रोजी घडली होती.
गुलाम रसूल शेख मस्तान मोमीन (२४, रा. मिल्लतनगर, चोपडा) आणि शेख मुज्ञ्जकीर हमीद पिंजारी (२५, रा. मण्यारअळी, चोपडा) अशी आरोपींची नावे आहेत. चोपडा येथील एक अल्पवयीन मुलगी शाळेत जात होती. त्यावेळी आरोपी गुलाम याने तिला धमकी दिली आणि सोबत येण्यास सांगितले. त्यानंतर तो पीडित मुलीला घेऊन बसने अमळनेर येथे आला. त्याने त्याचा मित्र शेख मुज्ञ्जकीर याला
बोलावून घेतले. दोघेजण मुलीला घेऊन गांधलीपुरा भागात गेले. तेथे काही तरुणांनी त्यांना पाहिल्यावर पोलिसांना माहिती दिली. पोलिस पोहोचताच गुलाम हा पळून गेला. त्यानंतर दोघांनाही अटक करत त्यांच्याविरुध्द चोपडा शहर पोलिसांत पोक्सो आणि अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. अॅड. राजेंद्र चौधरी यांनी युक्तिवाद करून ११ साक्षीदार तपासले. रिक्षाचालक आणि गांधलीपुरा भागातील प्रत्यक्ष साक्षीदार यांची साक्ष ग्राह्य धरण्यात आली. पैरवी अधिकारी म्हणून सहायक उपनिरीक्षक उदयसिंग साळुंखे, पोलिस नाईक हिरालाल पाटील, नितीन कापडणे, राहुल रणधीर, अतुल पाटील यांनी काम पाहिले.