गुन्हेजळगांवराजकीय

बीएचआर प्रकरण : अधिवेशनात आज मांडली जाणार लक्षवेधी, गृहमंत्र्यांच्या उत्तराकडे लक्ष

खान्देश टाइम्स न्यूज | १५ डिसेंबर २०२३ | जळगावातील भाईचंद हिराचंद रायसोनी पतसंस्थेत झालेल्या अपहार प्रकरणी नोव्हेंबर २०२० मध्ये पुणे येथे तीन गुन्ह्यांची नोंद करण्यात आली होती. गुन्ह्यातील काही धक्कादायक माहितीच्या आधारे आज विधानसभा अधिवेशनात लक्षवेधी सूचना मांडली जाणार असल्याची माहिती आहे. आ.मंगेश चव्हाण हे लक्षवेधी मांडणार असल्याची माहिती असून लक्षवेधीच्या माध्यमातून पोलीस प्रशासनातील काही अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाईची शक्यता आहे.

राज्यभरात तीन वर्षापूर्वी बी.एच.आर.पतसंस्थेचा अपहार घोटाळा प्रचंड गाजला होता. अनेक नामी हस्ती आणि मातब्बर नेत्यांची नावे देखील या गुन्ह्यात समोर आली होती. बी.एच.आर. प्रकरण शांत झाले असे वाटत असताना नंतर त्यात अनेक धक्कादायक उलगडे झाले, विशेषतः पोलीस प्रशासनाच्या कामकाजावर ताशेरे ओढण्यात आले. बी.एच.आर.प्रकरणी नोव्हेंबर २०२० मध्ये पुणे येथे तीन गुन्हे दाखल करण्यात आले होते. गुन्ह्यातील तपासाच्या दृष्टीने काही धक्कादायक माहितीच्या आधारे मंत्री गिरीश महाजन यांचे निकवर्तीय आ.मंगेश चव्हाण हे आज हिवाळी अधिवेशनात एक लक्षवेधी सूचना मांडणार असल्याची माहिती आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जळगांव येथील बी.एच.आर.या पतसंस्थेमध्ये नोव्हेंबर २०२० मध्ये पुणे येथे नोंद झालेल्या तिन्ही गुन्हयात फिर्यादी हजर नसतांना विस्मयकारकरित्या गु.र.क्र. ७५४/२०२० गुन्हयाची नोंद रात्री २३.५६ वा. पोलीस ठाणे शिक्रापूर, पुणे ग्रामीण पोलिस, गु.र.क्र. ७७३/२०२० गुन्हयाची नोंद सकाळी २.३३ वा. पोलिस ठाणे डेक्कन पुणे शहर पोलिस आयुक्तालय, गु.र.क्र. ३०६ / २०२० गुन्हयाची नोंद सकाळी ००.१० वा. पोलिस ठाणे आळंदी पिपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात, सदरील गुन्हे एकाच दिवशी म्हणजे दिनांक २५ नोव्हेंबर, २०२० रोजी नोंदविण्यात आलेले असणे, तसेच पुणे शहर पोलिस आयुक्तालयाअंतर्गत डेक्कन पोलीस ठाण्यातील गु.र.क्र. ६७३/२०२० हा गुन्हयासाठीच्या कार्यालयीन टिप्पणीत खाडाखोड करून पाने देखील बदलविण्यात आलेली असणे, विशेष आश्चर्याची बाब म्हणजे सदरील गुन्हे हे जरी दिनांक २५ व २६ नोव्हेंबर, २०२० रोजी नोंदविण्यात आलेले असतांना, सदरील गुन्हयाकामी तपासाकरीता जाणा-या अधिकारी व कर्मचा-यांकरीता पूर्वीच म्हणजे दिनांक २३ नोव्हेंबर, २०२० रोजी फर्दापूर येथील अजंता गेस्ट हाउस बुक करण्यात आलेले होते.

या उपरोक्त गंभीर प्रकरणात अभियंता कुणाल शहा व लेखापरीक्षक महावीर चोरडिया यांनी तक्रार दिल्यानंतर राज्य गुन्हे अन्वेषण विभाग म.रा. पुणे यांना उपरोक्त गुन्हयासंदर्भात पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी केलेल्या गैरप्रकाराबाबतीत चौकशी करण्याचे आदेश दिलेले होते. संबंधित प्रकरणात चौकशी करून अहवाल सादर करण्यात आलेला आहे किंवा कसे? याबाबत शासनाने तातडीने करावयाची कार्यवाही व प्रतिक्रिया याबाबत लक्षवेधी सादर केली जाणार आहे. आ.मंगेश चव्हाण यांनी आजवर जिल्ह्यात मांडलेल्या अनेक मुद्द्यांमुळे अनेकांना न्याय मिळाला आहे तर अन्याय करणाऱ्यांना चपराक बसली आहे. आ.चव्हाण यांनी लक्षवेधी मांडल्यावर त्यात इतर देखील सदस्य सहभागी होतील आणि त्यावरील चर्चेनंतर उत्तर देताना ठोस कारवाई आश्वासन मिळेल अशी शक्यता आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button