“युवावस्था : संवरण्याची वेळ, नाही बिघडण्याची” ; SIO जळगावतर्फे प्रेरणादायक व्याख्यानाचे आयोजन

“युवावस्था : संवरण्याची वेळ, नाही बिघडण्याची” – SIO जळगावतर्फे प्रेरणादायक व्याख्यानाचे आयोजन
जळगाव आसिफ शेख
स्टुडंट्स इस्लामिक ऑर्गनायझेशन ऑफ इंडिया (SIO), जळगाव सिटी युनिटतर्फे “युवकांच्या समस्या व उपाय” या विषयावर प्रभावी, उद्देश्यपूर्ण व दृष्टीकोनात्मक व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात आधुनिक काळात तरुणांना भेडसावणाऱ्या मानसिक, नैतिक, सामाजिक व शैक्षणिक समस्यांवर गंभीर चर्चा करण्यात आली.
मुख्य वक्ता म्हणून मलकापूर येथून आलेले प्रख्यात मोटिवेशनल स्पीकर, मानसशास्त्रज्ञ व SIO चे माजी राज्य सचिव डॉ. उमेर मोहसिन यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. “युवावस्था ही जीवनातील सर्वात मौल्यवान वेळ असून ती बिघडवण्याची नाही तर स्वतःला घडवण्याची संधी आहे. आज घेतलेले निर्णयच उद्याचे भविष्य ठरवतात,” असे ते म्हणाले.
आपल्या भाषणात त्यांनी तरुणांमध्ये वाढणारी अश्लीलतेची सवय, फह्श कंटेंटची सहज उपलब्धता, नैतिक अधःपतन, चुकीची संगत, व्यसनाधीनता (सिगारेट, गुटखा, तंबाखू) व डिजिटल व्यसन या धोकादायक प्रवृत्तींचा उहापोह केला. तसेच त्यांनी इस्लामिक मूल्यांच्या आधारे या समस्यांमधून बाहेर पडण्याचे उपाय सुचवले.
डॉ. उमेर यांनी उपस्थित तरुणांना क्षणिक सुखाच्या मागे न लागता सकारात्मक विचार, आत्मसंयम, उद्दिष्ट ठरवणे आणि समाजात सकारात्मक भूमिका निभावण्याचे आवाहन केले. कार्यक्रमात अँग्लो इंजिनिअरिंग कॉलेजमधील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. व्याख्यानानंतर विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना डॉ. उमेर यांनी अत्यंत संयमाने आणि समजुतीने उत्तरे दिली.
हा कार्यक्रम SIO जळगाव सिटी युनिटतर्फे सुरू असलेल्या नैतिक आणि बौद्धिक उन्नतीच्या प्रयत्नांचा एक भाग होता. युवांमध्ये नैतिक संवाद, मानसिक आरोग्य, व्यसनमुक्ती, अश्लीलतेचे सामान्यीकरण आणि लैंगिक संघर्ष अशा विषयांवर जागरूकता निर्माण करून समाजात समतोल निर्माण करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात आला.
कार्यक्रमाचा मुख्य संदेश स्पष्ट होता – युवावस्था जर वाया गेली तर विनाश ओढवतो, पण जर ती योग्य प्रकारे घडवली गेली तर यश व उंची गाठण्याचा मजबूत पाया ठरते.





