जळगाव;- काहीही कारण नसताना रामेश्वर कॉलनीतील सिध्दार्थ नगरात रस्त्याने जाणाऱ्या सोमनाथ निंबा वंजारी (वय-२९, रा. रामेश्वर कॉलनी) याला मारहाण करीत त्यांच्यावर चाकूने वार करण्यात आल्याची घटना ३१ डिसेंबर रोजी संध्याकाळी घडली होती. या प्रकरणी दादू उर्फ दीक्षांत देविदास सपकाळे व त्याच्यासोबत असलेल्या एका जणाविरुद्ध गुन्हा दाखल झाल्यानंतर सपकाळे याला एमआयडीसी पोलिसांनी अटक केले. त्याला न्यायालयात हजर केले असता त्याला पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
सोमनाथ निंबा वंजारी वय-२९ रा. रामेश्वर कॉलनी, जळगाव हे आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहे. रविवारी ३१ डिसेंबर रोजी सायंकाळी साडेसात वाजता सोमनाथ वंजारी हा सिध्दार्थ नगरातून जात असतांना काहीही कारण नसतांना दादू उर्फ दिक्षात देवीदास सपकाळे याने माझ्याकडे काय पाहतो असे म्हणत मारहाण केली. त्यावेळी सोमनाथ हे तेथून निघून गेले. त्यानंतर मेहरुण तलावाकडून परत येत असताना दीक्षांत व त्याच्या सोबत असलेल्या एकाने थांबवून पुन्हा मारहाण केली व पोटाजवळ चाकूने वार केले. आमच्या नांदी लागू नको असे म्हणत ते तेथून निघून गेले.
या विषयी जखमीने एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला. हल्लेखोर मेहरुण तलाव परिसरातच असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोउनि दीपक जगदाळे, सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, पोहेकॉ संजय धनगर, किशोर पाटील, सुधीर साळवे, ललित नारखेडे, किरण पाटील, साईनाथ मुंडे, छगन तायडे यांनी रात्रीच त्याला अटक केली.