जामनेर;- शहरात काही सराईत गुन्हेगारांनी हैदोस घातला असून गुंडगिरी वाढत चालली आहे. शहरातील हॉटेल न्यू दिल्ली दरबार या बियर बार वरील मालक शंकर मराठे यांचा मुलगा कल्पेश मराठे यास या गुंडांनी आज दारूच्या नशेत बिल मागितले असता मारहाणकरून हैदोस घातला .याच्या निषेधार्थ जामनेर तालुका लिकर असोसिएशन तर्फे एक दिवशीय बंद पाळण्यात आला असून गाव गुंड विकास धनगर व त्याच्या साथीदाराचा त्वरित बंदोबस्त करावा. त्यांना अटक करून कडक शासन करण्यात यावे अशा मागणीचे निवेदन आज तालुका लिकर असोसिएशनचे तालुकाध्यक्ष शंकर मराठे यांच्या नेतृत्वाखाली आज पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांना देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की विकास धनगर व त्याचे साथीदार हॉटेल दिल्ली दरबार मध्ये दारू पिण्यासाठी आले. दारू पिऊन निघून जात असताना काउंटरवर बसलेले कल्पेश मराठे यांनी त्याला बिल मागितले असता विकास धनगर व त्याच्या साथीदाराने हुज्जत घालून कल्पेश मराठे यांना मारहाण करून गल्यातील सात आठ हजार रुपये व गळ्यातील सोन्याची चैन हिसकावून ते पळून गेले. यापुढे पैसे मागितले तर जीवे मारण्याची धमकी त्यांनी दिली.
बार असोसिएशनचे तालुकाध्यक्ष शंकर मराठे यावेळी पत्रकारांशी बोलताना म्हणाले की परमिट रूम धारक हे शासकीय मान्यता प्राप्त असून हजारो कोटी रुपयांचा महसूल या व्यवसायापासून सरकार वसूल करत असते. प्रत्येक परमिट रूम धारक हा प्रत्येक दिवसाला शासनाला आपल्या विक्री नुसार चार ते पाच हजार रुपये रोजचा महसूल शासनाकडे जमा करतो .अशा मान्यताप्राप्त असलेल्या दुकानदारांना जर गाव गुंडांकडून त्रास होत असल्यास शासनाचा महसूल बुडून दुकानदारांना सुद्धा मानसिक त्रास होणार आहे . अशा गावगुंडांचा पोलीस प्रशासनाने व शासनाने त्वरित बंदोबस्त करावा व त्यांना कठोर शासन करावे अन्यथा यापुढे जर अशा प्रकारे दुकानदाराला धमक्या दिल्या गेल्या तर लिकर असोसिएशन तर्फे बेमुदत बंद पाळण्यात येईल. असेही त्यांनी सांगितले. निवेदनावर नाना प्रकाश शेळके ,गोपि कलाल, लक्ष्मण कलाल, श्रावण कलाल, जगदीश दादा शर्मा, अशा दुकानदाराच्या सह्या आहेत.