खान्देशजळगांवशासकीय

घरकुल योजनांची शंभर टक्के अंमलबजावणी करावी – गुलाबराव पाटील

जलजीवन मिशनच्या कामांना गती देण्यात यावी ; जिल्हा परिषदेच्या कामकाजाचा आढावा

जळगाव,;- जिल्हा परिषद मार्फत राबविण्यात येणाऱ्या योजना या लोकाभिमुख आहेत. प्रधानमंत्री आवास, रमाई आवास शबरी घरकुल, मोदी आवास व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आवास योजनेच्या माध्यमातून तळागाळातील गरीब लाभार्थ्यांना आपल्या स्वप्नाचे घरकुल मिळेल यासाठी या घरकुल योजनांची शंभर टक्के अंमलबजावणी करण्यात यावी. अशा सूचना पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आज येथे दिली‌.

ज‍िल्हाध‍िकारी कार्यालयात ज‍िल्हा पर‍िषदेअंतर्गत सुरू असलेल्या व‍िव‍िध कामांच्या पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी खासदार उन्मेष पाटील, खासदार रक्षा खडसे, आमदार संजय सावकारे, आमदार सुरेश भोळे, आमदार लता सोनवणे, आमदार किशोर पाटील, ज‍िल्हाध‍िकारी आयुष प्रसाद, जिल्हा पर‍िषदेचे मुख्य कार्यकारी अध‍िकारी अंक‍ित, फैजपूर उपविभागीय अधिकारी देवयानी यादव, अत‍िर‍िक्त मुख्य कार्यकारी अध‍िकारी राजेश लोखंडे, रणधीर सोमवंशी, उपमुख्य कार्यकारी अध‍िकारी अनिकेत पाटील, भारत कोसोदे, ज‍िल्हा पर‍िषद बांधकाम व‍िभाग कार्यकारी अभियंता एस.बी.पाटील, जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता गणेश भोगावडे, व‍ित्त व लेखा अधिकारी बाबुलाल पाटील आदी उपस्थ‍ित होते.

केंद्र व राज्य शासनाद्वारे प्राप्त व‍िविध न‍िधीअंतर्गत सुरू असलेल्या कामांची प्रगती, प्रधानमंत्री व मुख्यमंत्री ग्रामसडक योजना, जिल्हा पर‍िषद रस्ते बांधकाम, अंगणवाडी बांधकाम, सर्व प्रकारच्या आवास योजनांची प्रगती, जलजीवन म‍िशन प्रगतीबाबत आढावा घेण्यात आला. यावेळी ज‍िल्हा न‍ियामक सम‍ितीची बैठक ही घेण्यात आली.

पालकमंत्री म्हणाले की, प्रधानमंत्री व मुख्यमंत्री सडक योजनेतील ग्रामीण रस्त्यांची कामे गुणवत्तापूर्ण करण्यावर भर द्यावा. मार्च २०२४ पर्यंत ग्रामीण रस्त्यांची कामे पूर्ण झाली पाहिजेत‌. अशी अपेक्षा ही पालकमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली.

घरकुलांसाठी जागा देतांना‌ त्याठिकाणी रस्ते, पाणी, वीज, मलनिस्सारण व्यवस्था सहज व्यवस्थित असल्याची खात्री करावी. जिल्ह्यात जलजीवन मिशनच्या कामांना गती देण्यात यावी. खेड्यामध्ये काही गल्ली -भागात पाईप‌लाईन पोहचली नसल्यास नव्याने प्रस्ताव तयार करण्यात यावा. गावातील प्रत्येक भागात पाणी पोहचले पाहिजे. गावात पाण्याचा स्रोत नसेल तर विहिरी खोदून गावांना पाणी उपलब्ध करून देण्यात यावी. यासाठी पोलीस संरक्षण देऊन विहीर खोदण्यात यावी‌‌. जलजीवन मिशनचे काम झालेल्या ठिकाणी बोर्ड लावण्यात यावे. जलजीवन मिशन योजनांची कामे पूर्ण झाल्यावर खासदार व आमदारांच्या हस्ते उद्घाटन करण्यात यावे‌. असेही पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले.

सार्वजनिक शौचालयांसाठी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात निधी‌‌ उपलब्ध आहे. यासाठी ग्रामपंचायतीने तात्काळ प्रस्ताव पाठविण्यात यावा. मार्च २०२४‌ पर्यंत जिल्ह्यातील अंगणवाड्यांचे बांधकामे पूर्ण करण्यात यावे. जिल्ह्यातील प्रत्येक रूग्णालयात आयुष्यमान कार्डच्या माध्यमातून कार्डधारकांवर ५ लाखांपर्यंत मोफत उपचार करण्यात यावा. अशा सूचनाही पालकमंत्र्यांनी यावेळी दिल्या.

यावेळी खासदार रक्षा खडसे, खासदार उन्मेष पाटील, आमदार सुरेश भोळे, आमदार संजय सावकारे, किशोर पाटील यांनी चर्चेत सहभाग घेतला व सूचना दिल्या.

घरकुलांसाठी २१ हजार ६०० भूमीहीन लाभार्थ्यांना जिल्ह्यात जमीनी देण्यात आल्या आहेत. मोदी आवास योजनेत घरकुल मंजूरीत जळगाव राज्यात प्रथम क्रमांकावर आहे‌. अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित यांनी यावेळी माहिती दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button