खान्देशजळगांवराजकीय

निवडणुकीआधी १५ ते २० दिवसांत महाराष्ट्रात राजकीय भूकंप- ना. गिरीश महाजन

मुंबई-;- देशभरातील विरोधी पक्षांनी एकत्र येऊन भाजप विरोधात इंडिया आघाडीची स्थापना केली आहे. तर महाराष्ट्रात महाविकास आघाडीतही जागावाटपासाठी बैठका सुरु आहेत. दुसरीकडे सत्ताधारी पक्षांच्या गोटातही जोरदार हालाचाली घडत आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या पडद्यामागे अनेक घडामोडी घडत आहेत. प्रत्येक पक्षाच्या गोटात जोरदार हालचाली घडत आहेत.असं असताना आता भाजपचे नेते आणि राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी महाराष्ट्राच्या राजकारणाबाबत मोठं भाकीत वर्तवलं आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात पुढच्या 15 ते 20 दिवसांमध्ये मोठा राजकीय भूकंप होणार असल्याचा दावा गिरीश महाजन यांनी केला आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या आधी राजकीय भूकंप होणार असं गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे. 15 ते 20 दिवसांमध्ये मोठा राजकीय भूकंप होणार असल्याचं भाकीत गिरीश महाजन यांनी वर्तवलं आहे. गिरीश महाजन यांनी आज प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देत असताना याबाबत भाष्य केलं. “बघा, निवडणुकीच्या आधीच होईल. आपल्याला कळेल कुठल्या पक्षात काय-काय घडतंय म्हणून. पण निश्चित निवडणुकीच्या तोंडावर पुढच्या 15 ते 20 दिवसांत मोठे भूकंप झालेले बघायला मिळतील”, असं गिरीश महाजन म्हणाले.

गिरीश महाजन हे भाजपच्या महत्त्वाच्या नेत्यांपैकी एक आहेत. भाजपचे संकटमोचक नेते अशीदेखील त्यांची ख्याती आहे. याशिवाय ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अतिशय जवळचे आणि विश्वासू नेते असल्याचं मानलं जातं. त्यामुळे त्यांच्या वक्तव्याला महत्त्व आहे. राज्यात आगामी काळात अनेक महत्त्वाच्या राजकीय घडामोडी घडणार आहेत. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर येत्या 10 जानेवारीला शिवसेना आमदार अपात्रतेच्या प्रकरणाचा निकाल जाहीर करणार आहेत. हा निकाल ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या बाजूने लागला तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मोठा झटका बसणार आहे. तसा निकाल लागला तर एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांच्या गटाचे 16 आमदार अपात्र ठरतील. तसेच हे शिंदे सरकारही कोसळू शकतं. पण निकाल एकनाथ शिंदे यांच्या बाजूने लागला तर सध्याचं सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करेल. आमदार अपात्रतेच्या प्रकरणाआधी गिरीश महाजन यांनी हे वक्तव्य केल्याने त्यांच्या वक्तव्याला महत्त्व प्राप्त झालं आहे.

गेल्या दीड वर्षात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन पक्षांमध्ये फूट पडली आहे. या पक्षांनंतर आता महाराष्ट्रातील काँग्रेस पक्षात फूट पडेल, अशी भाकीतं सातत्याने वर्तवण्यात आली आहे. विशेष म्हणजे काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वातील एक मोठा गट काँग्रेसमधून बाहेर पडून भाजपात येईल, अशा चर्चा सातत्याने होत असतात. पण अशोक चव्हाण यांनी या चर्चांचं सातत्याने खंडन केलं आहे. असं असताना आता गिरीश महाजन यांनी येत्या 15 ते 20 दिवसात महाराष्ट्रात तिसरा राजकीय भूकंप घडेल, असे संकेत दिले आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे.
I

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button