पारोळा :- एका पत्र्याच्या शेडमध्ये असलेल्या १० शेळ्यांचा बिबट्याने फडशा पाडल्याची घटना ७ रोजी रात्री १ ते दीड वाजेच्या सुमारास तालुक्यातील बाहुटे येथे घडली . यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
याबाबत माहिती अशी कि , बाहुटे येथे भूषण भागवत पाटील यांनी रात्री नेहमीप्रमाणे पत्र्याच्या शेडमध्ये १७ बकऱ्यांना चारा पाणी करुन बांधून निघून गेले. ७ रोजी पहाटे एक ते दीड वाजेच्या सुमारास बिबट्या किवा तडसाने या बकऱ्यांवर हल्ला केला. या बकऱ्यांचे लचके तोडल्याने १० बकऱ्यांचा जागीच मृत्यू झाला. तर ७ बकऱ्या गंभीर जखमी झाल्या आहेत. या घटनेची माहिती रात्री दीड वाजता शेडच्या काही अंतरावर राहणाऱ्या व्यक्तीने गावात भ्रमणध्वनीद्वारे दिली. त्यानंतर ग्रामस्थांनी लाठया, काठ्या, बॅटरी घेऊन घटनास्थळ गाठले. मात्र, तोपर्यंत बिबट्याने तेथून धूम ठोकली होती. या घटनेमुळे बाहुटे ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच सकाळी ८ वाजता वन विभागाच्या अधिकाऱ्यांसह वनपात वैशाली गायकवाड यांच्या पथकाने धाव घेत पंचनामा केला. तर डॉ. योगेश देखमुख यांनी मयत बकऱ्यांचे शवविच्छेदन केले. तर पोलिस पाटील यांनी सूचना केल्या.