जळगाव ;- डेटा सायन्सचे महत्व सर्व क्षेत्रांमध्ये वाढीला लागले असून यामध्ये रोजगाराच्या मोठ्या संधी आहेत. मात्र त्यासाठी विश्लेषण क्षमता विकसित करण्याची गरज आहे असे प्रतिपादन राष्ट्रीय सांख्यिकी आयोगाचे अध्यक्ष राजीव करंदीकर यांनी संख्याशास्त्र विभागाच्यावतीने आयोजित राष्ट्रीय कार्यशाळेचे उद्घाटन करतांना केले. त्यांनी या कार्यशाळेला ऑनलाईन संबोधित केले.
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या गणितशास्त्र प्रशाळेतील संख्याशास्त्र विभागाच्यावतीने दि. १२ व १३ जानेवारी रोजी “डाटा सायन्स ॲण्ड अॅपलाईड स्टॅटस्टिक्स” या विषयावर राष्ट्रीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली असून या कार्यशाळेचे उद्घाटन डॉ. करंदीकर यांच्या हस्ते झाले. त्यांनी उपस्थितांना ऑनलाईन संबोधन केले. ते आपल्या भाषणात म्हणाले की, भारतात डेटा सायन्सचे मागणी वाढली आहे. सर्व क्षेत्रांच्या विश्लेषणासाठी डेटा सायन्स महत्वाचे आहे. यामध्ये करिअर करणा-या विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहेत. डेटा सायन्समध्ये कोणते मोड्युल वापरले जाते हे महत्वाचे आहे, अन्यथा निष्कर्ष चुकीचे निघू शकतात. साधने आणि तंत्र महत्वाचे आहेत. या क्षेत्रात विश्लेषण क्षमता विकसित केली जावी असे आवाहन त्यांनी केले.
प्रमुख पाहूणे म्हणून बोलतांना माजी कुलगुरू डॉ. के. बी. पाटील म्हणाले की, डेटा सायन्समध्ये संख्याशास्त्र हे महत्वाचे आहे. सर्व क्षेत्रांमध्ये डेटा सायन्स आता गरजेचे झाले आहे. केवळ पदवी प्राप्त करण्यापूरते शिक्षण न घेता विचार आणि विश्लेषण करण्याची सवय लावून घेण्याचे आवाहन त्यांनी केले. परिश्रम आणि प्रामाणिकपणा याशिवाय भविष्यात कोणताही पर्याय नाही असेही डॉ. के. बी. पाटील म्हणाले. वडोदराच्या महाराजा सयाजीराव विद्यापीठातील गणिततज्ज्ञ डॉ. के. मुरलीधरन आपल्या भाषणात म्हणाले की, संख्याशास्त्राशिवाय तुम्ही डेटा सायन्समध्ये पुढे जावू शकत नाही. सांख्यिकी सिध्दांतावर फोकस करण्याचे आवाहन यावेळी त्यांनी केले. गणितशास्त्रातील शिक्षकांनी येणा-या बदलांना सामोरे जाण्याची तयारी ठेवावी असेही आवाहन डॉ. मुरलीधरन यांनी केले.
प्रारंभी संख्याशास्त्र विभागप्रमुख डॉ. आर. एल. शिंदे यांनी प्रास्ताविक केले. पाहूण्यांचा परिचय प्रा. किर्ती कमलजा व प्रा. मनोज पाटील यांनी करून दिला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मधुजा शिंदे यांनी केले. डॉ. आर. डी. कोष्टी यांनी आभार मानले. यावेळी मंचावर गणितशास्त्र प्रशाळेचे संचालक प्रा. एस. आर. चौधरी उपस्थित होते. या कार्यशाळेत देशातून ७५ जण सहभागी झाले आहेत.