११ किलो गांजासह दोघांना अटक ; मुक्ताईनगर पोलिसांची धडक कारवाई:

११ किलो गांजासह दोघांना अटक ; मुक्ताईनगर पोलिसांची धडक कारवाई:
मुक्ताईनगर, (प्रतिनिधी): मुक्ताईनगर तालुक्यातील काकोडा शिवारात धामणगाव फाट्याजवळ मुक्ताईनगर पोलिसांनी शुक्रवारी सायंकाळी मोठी कारवाई करत तब्बल ११ किलो गांजा जप्त केला आहे. या अमलीपदार्थाची किंमत सुमारे २ लाख २३ हजार रुपये असून, याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी शनिवारी, १७ मे रोजी मध्यरात्री याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून न्यायालयाने आरोपींना पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
गोपनीय माहितीच्या आधारे मुक्ताईनगर पोलिसांना धामणगाव फाट्याजवळ गांजाची अवैध वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली. तत्काळ कारवाई करत पोलीस निरीक्षक नागेश मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने शुक्रवारी सायंकाळी ५:५० वाजता धडक कारवाई केली.
आरोपी आकाश उर्फ संतोष विष्णू रावळकर (वय २७) पवन संजय जवरे (वय २७) दोघेही कुऱ्हा, ता. मुक्ताईनगर येथील रहिवासी आहेत. या दोघांकडून ओलसर गांजा सापडला असून पोलिसांनी तो जप्त केला आहे. यासंदर्भात पोलीस नाईक हरीश गवळी यांच्या फिर्यादीवरून मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नयन पाटील हे करीत आहेत.