अमळनेर : येथील श्री मंगळ ग्रह मंदिरात मकर संक्रांतीच्या मंगलपर्वावर १५ जानेवारीला श्री मंगळग्रह देवतेचे बोरन्हाण घालण्यात आले. येथील आर्मी स्कूलचे शिक्षक उमेश काटे या बोरन्हाण पूजा, अभिषेकाचे विशेष यजमान होते.
यासाठी मंदिर विविध आकर्षक फुले व पतंगांच्या आरासने सजवण्यात आले होते. मंदिरातील श्री मंगळ ग्रह देवता बालरूपात प्रतिष्ठापित असल्याने मकर संक्रांतीनिमित्त हा पूजा, अभिषेक करण्यात आला. सुरूवातीला यजमान काटे यांनी देवतांचे विधिवत पूजन केले.
पुजाऱ्यांनी केलेल्या विविध मंत्रघोषांच्या साथीने श्री मंगळ ग्रह देवतेचे बोर, ऊस, हरभरा, तीळगूळ, गोळ्या, चॉकलेट याद्वारे बोरन्हाण घालण्यात आले. या प्रसंगी काटे यांनी विश्वातील मानवजातीला व्याधी, इडा पिडा व अनंत अडचणींतून दूर करून त्यांच्यात सदैव सुख-समृद्धी नांदावी, यासाठी प्रार्थना केली. श्री मंगळ ग्रह देवतेची महाआरतीही झाली. याप्रसंगी भाविकांची मोठी उपस्थिती होती. सौरभ वैष्णव यांनी पौरोहित्य केले.