खान्देश टाइम्स न्यूज | दि.१७ जानेवारी २०२४ | जिल्ह्यातील चाळीसगाव येथे प्रसिध्द कथाकार प्रदीप मिश्रा महाराज यांची शिवमहापुराण कथा सुरू आहे. कथेच्या ठिकाणी कर्तव्य बजावत असलेले जळगाव येथील होमगार्ड सय्यद हाफिज यांचा सायंकाळी हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला.
चाळीसगाव येथे दि.१६ ते २० जानेवारी दरम्यान प्रसिध्द कथाकार प्रदीप मिश्रा महाराज यांच्या शिवमहापुराण कथेचे आयोजन करण्यात आले आहे. राज्यभरातून कथेला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून लाखोंच्या संख्येने भाविक कथा ऐकण्यासाठी आलेले आहेत.
कथेच्या ठिकाणी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी जळगाव जिल्हा पोलीस दलातील अधिकारी, कर्मचाऱ्यांसह होमगार्ड देखील आपले कर्तव्य बजावत आहे. बुधवारी दुपारच्या सुमारास कर्तव्य बजावत असलेले होमगार्ड सय्यद हाफिज सय्यद राऊफ (वय-५४) रा. गेंदालाल मील, जळगाव यांना हृदयविकाराचा झटका आला. सय्यद यांना अस्वस्थ वाटू लागल्याने सहकाऱ्यांनी त्यांना लागलीच रुग्णालयात दाखल केले मात्र त्यांची प्राणज्योत मालवली.
होमगार्ड सय्यद हाफिज हे अनेक वर्षापासून आपले कर्तव्य चोखपणे बजावत होते. आपल्या मोकळ्या स्वभावामुळे ते सर्वांना परिचित होते. सय्यद हाफिज यांच्या निधनामुळे परिसरावर मोठी शोककळा पसरली आहे.