अमळनेर ;- येथील मंगळ ग्रह सेवा संस्थेने येथील बस स्थानकाला दत्तक घेतले आहे. त्या अनुषंगाने बस स्थानकाचा एकूणच चेहरा मोहरा बदलण्याचा उपक्रमाचे ७ जुलै रोजी नामदार अनिल भाईदास पाटील यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. जिल्हाधिकारी अमन मित्तल कार्यक्रमाचे अध्यक्ष असतील. जिल्हा नियोजन अधिकारी प्रतापराव पाटील आणि जिल्हा विभाग नियंत्रक भगवान जगनोर प्रमुख अतिथी असतील .
अमळनेर हे शिक्षणाचे मोठे केंद्र आहे येथील बाजारपेठही मोठी आहे. येथे अद्यावत वैद्यकीय सुविधाही उपलब्ध आहेत. श्री मंगळ ग्रह मंदिरात दर्शनासाठी देशभरातून येणाऱ्या भाविकांचा ओघही मोठा आहे. या पार्श्वभूमीवर येथील बस स्थानकाचे सुशोभीकरण अद्यावतीकरण व अत्यावश्यक सोयी सुविधा उपलब्धीकरण मंगळ ग्रह सेवा संस्थेने करून द्याव्यात या आशयाचे विनंती पत्र येथील आकाराने संस्थेला दिले आहे. सदर विनंती प्रस्तावास संस्थेने होकार देऊन आगाराचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी युद्धपातळीवर योजना आखली आहे. या योजनेअंतर्गत आगाराच्या संपूर्ण परिसरात मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण आणि वृक्षसंवर्धन , छोट्या स्वरूपातील बाग- बगीचे तयार करणे, २४ तास आरओ वॉटर सेवा, रंगरंगोटी, प्रबोधनपर चित्र व शिल्प निर्मिती, लायब्ररी, मातांना स्तनपानासाठी आरामदायी हिरकणी कक्ष, स्वच्छता गृहांचे नूतनीकरण यासह अनेक बाबींचा समावेश आहे .
येथील नामदार अनिल पाटील यांचा ७ जुलै रोजी वाढदिवस आहे. तसेच मंत्री झाल्यानंतर त्यांचे प्रथम आगमनही ७ जुलै रोजी होत आहे. याचे औचित्य साधून सकाळी १२ वाजता सदर उपक्रमाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम बस स्थानक परिसरात होणार आहे. कार्यक्रमाला जास्तीत जास्त नागरिकांच्या उपस्थितीचे आवाहन संस्थेने केले आहे.