जळगाव शहर मनपाच्या नगररचना विभागाचा अनागोंदी कारभार
खान्देश टाइम्स न्यूज | २९ जानेवारी २०२४ | जळगाव शहर मनपातील नगररचना विभगविरुद्ध नेहमीच ओरड होत असते. अनेकदा महासभेत देखील नगरसेवकांनी अधिकाऱ्यांवर आरोप केले आहे. मनपात प्रशासक राज आल्यापासून तर नगररचना विभागातील अनागोंदी कारभाराच्या दबक्या आवाजात चर्चा सुरू झाल्या असून काही नगरसेवक यावर मंत्र्यांच्या दरबारी आवाज उठवण्याच्या तयारीत आहे. अनेक मोठ्या इमारतींच्या अनधिकृत बांधकाम परवानगी आणि पूर्णत्व प्रमाणपत्रासाठी आर्थिक देवाणघेवाण केली जात असल्याची चर्चा होत आहे.
जळगाव शहर मनपातील नगररचना विभाग नेहमीच वादाच्या भोवऱ्यात सापडत असतो. अनेकदा नगरसेवकांनी नगररचना विभागाविरुद्ध आवाज उठवला आहे मात्र तरीही त्या विभागाकडून चोख कामाची अंमलबजावणी होत नसल्याचे दिसून येते. काही वर्षापूर्वी तर नगरसेवक अनंत जोशी यांनी थेट नगररचना विभागालाच टाळे ठोकले होते तर महासभेत नगरसेवक कैलास सोनवणे यांनी नगररचना विभागातील अधिकाऱ्यांकडून एका बांधकाम व्यवसायिकाला पैशांची मागणी केल्याचा आरोप केला होता. नुकतेच मनपा प्रशासनाने पार्किंगच्या जागेचा व्यावसायिक वापर करणाऱ्या मालमत्ताधारकांना नोटीस बजावण्यात आली होती. नोटीस बजावलेल्या काही मालमत्ताधारकांनी तर बांधकाम पूर्णत्वाचा दाखलाच सादर केला. नियमानुसार बांधकाम नसताना बांधकाम पूर्णत्वाचा दाखला असणे यावरूनच नगररचना विभागातील भ्रष्टाचार लक्षात येतो.
नगररचना विभाग कायम चर्चेत असला तरी त्यावर कोणाचाही अंकुश नसल्याचे दिसून येते. मनपात सध्या सत्ताधारी सदस्यांचा कार्यकाळ संपून प्रशासक राज सुरू आहे. प्रशासकांच्या कार्यकाळात मनपा नगररचना विभागाचा कारभार सुधारेल अशी अपेक्षा जळगावकर व्यक्त करीत होते मात्र सध्या तरी तसे दिसून येत नाही. नगररचना विभागात सध्या अर्धा डझन अधिकारी कार्यरत असून शहरात अनेक मोठमोठ्या इमारतींचे बांधकाम देखील सुरू आहे. इमारतींच्या बांधकामाची शहनिशा न करता थेट परवानगी दिली जात असल्याचे प्रकार सध्या दिसून येत आहेत. नगररचना विभागात सुरू असलेल्या अनागोंदी कारभारामुळे सर्व काम आर्थिक हित जोपासून होत असल्याची जोरदार चर्चा आहे. मनपा आयुक्त डॉ.विद्या गायकवाड या सदर प्रकाराबाबत अनभिज्ञ आहेत की त्या याकडे दुर्लक्ष करीत आहेत हे तर आगामी काळात लक्षातच येईल.