रावेर : रावेर शहरातील माजी उपनगराध्यक्ष सुधीर पाटील हे पुराच्या पाण्यात बुधवारी वाहून गेल्यानंतर तब्बल ३६ तासांनन्तर शुक्रवारी सकाळी १० वाजता आसराबारी येथील खदाणीत त्यांचा मृतदेह आढळून आला. तालुक्यात बुधवारी रात्रीपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे रावेर तालुक्यातील नदी-नाल्यांना पूर आला आल्याने उपनगराध्यक्षांसह अन्य दोन जण वाहून गेल्याची घटना घडली होती. यातील दोघांचे मृतदेह गुरुवारी आढळून आले. तर माजी उपनगराध्यक्ष सुधीर पाटील यांचा मृतदेह आज ७ रोजी सकाळी १० वाजता सापडला .
रावेर येथील माजी नगरसेवक सुधीर पाटील हे नागझिरी नदीवरील पुलावरून दुचाकीवरून जात असताना वाहून गेल्यानंतर तब्बल 36 तासानंतर शुक्रवारी सकाळी 10 वाजता त्यांचा मृतदेह आसराबर्डी भागातील खदाणीत सापडला .. तहसीलदार बंडू कापसे, रावेरचे पोलीस निरीक्षक कैलास नागरे यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळ अधिकारी यासीन तडवी, तलाठी स्वप्नील परदेशी, गुणवंत बारेला आदींसह स्थानिक पदाधिकार्यांनी माजी नगरसेवकासाठी शोध मोहिम राबवली.
५ जुलै रोजी रात्री सातपुडा पर्वताच्या रांगांमध्ये मुसळधार पावसामुळे नदी नाल्यांना मोठा पूर आला. नदीच्या पुराच्या पाण्यात मोरव्हाल, ता.रावेर येथील बाबूराव रायसिंग बारेला (40) हे वाहिल्यानंतर त्यांचा गुरुवारी मृतदेह हाती आला तर रावेरातील नागझिरी नदीला पावसामुळे पूर आल्याने रावेर शहरातील नदीकाठी वास्तव्यास असलेल्या ईकबाल कुरेशी (50) यांच्या घरात पुराचे पाणी शिरल्यानंतर पुराच्या पाण्याने भिंत अंगावर पडल्याने त्यांचा मृत्यू ओढवला होता.