जळगाव ;- दोन बंद घर फोडून घरातील सामानांची तोडफोड करत ४३ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटनाशहरातील समता नगर येथील वंजारी टेकडीजवळ शनिवारी ३ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता उघडकीस आली असून याबाबत रामानंदनगर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सूत्रांची दिलेली माहिती अशी की, जळगाव शहरातील समता नगर परिसरातील वंजारी टेकडी जवळ ईश्वर रामदास चव्हाण व त्यांच्या घराशेजारी त्यांचे चुलत भाऊ अजय प्रल्हाद चव्हाण राहतात.दोघांचे घर बंद असतांना अज्ञात चोरट्याने दोन्ही घराचे दरवाजाचे कडी कोयंडा तोडून आत प्रवेश करत घरातील वस्तूंची तोडफोड केली आणि घरातील गॅस सिलेंडर, इलेक्ट्रिक मोटर पंप, टीव्ही, होम थिएटर, घरातील भांडी आणि दुचाकी असा एकूण ४३ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्याने चोरून नेला. हा प्रकार शनिवारी ३ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता समोर आला. याबाबत ईश्वर चव्हाण यांनी रामानंदनगर पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार रविवारी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल सुशील चौधरी हे करीत आहे.