राहुल गांधींच्या शिक्षेला स्थगिती देण्याची मागणी उच्च न्यायालयाने फेटाळली
अहमदाबाद ;- मोदी’ आडनावावरून अवमानकारक टिप्पणी केल्याच्या प्रकरणात काँग्रेस नेते राहुल गांधी यांना दिलासा मिळालेला नाही. दोन वर्षांच्या शिक्षेला स्थगिती देण्याची त्यांची मागणी गुजरात उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. याचाच अर्थ असा की राहुल गांधी यांची लोकसभा खासदारकी रद्दच राहणार आहे. हा राहुल गांधी यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. दरम्यान, राहुल गांधींच्या शिक्षेला स्थगिती देण्याची पुनर्विचार याचिका फेटाळणाऱ्या गुजरात उच्च न्यायालयाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देऊ, असे अखिल भारतीय काँग्रेस समितीचे सरचिटणीस के सी वेणुगोपाल यांनी म्हटले आहे.
राहुल गांधींच्या शिक्षेला स्थगिती देण्याची विनंती करणारी त्यांची याचिका फेटाळल्यानंतर दिल्लीतील काँग्रेस कार्यालयाबाहेर राहुल यांच्या समर्थनार्थ काँग्रेस कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. दरम्यान, उच्च न्यायालयाच्या निकालाचे भाजपने स्वागत केले आहे. ”आम्ही न्यायालयाच्या निकालाचे स्वागत करतो. राहुल यांनी आता विचार करावा आणि इतिहास रचू नये, असे भाजप आमदार पुर्णेश मोदी यांनी म्हटले आहे.