खान्देश टाइम्स न्यूज | ७ जुलै २०२३ | मे महिन्याच्या अखेरीस रावेर येथील दोन गोदाममध्ये अवैद्य धान्यसाठा आढळून आला होता. या प्रकरणात चौकशीअंती दहा दिवसानंतर दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, गेल्या दोन दिवसात सील केलेले धान्य गोदाम उघडण्यासाठी जलद गतीने हालचाली झाल्या असून गोदाम उघडले जाणार असल्याचे वृत्त खान्देश टाइम्स न्यूजने प्रकाशित केले होते. अखेर वृत्त खरे ठरले असून जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच गोदामचे सील उघडण्यात आले आहे. प्रांताधिकारी कैलास कडलग यांनी देखील वृत्ताला दुजोरा दिला आहे.
जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी केलेल्या तपासणीत दि.३१ रोजी रावेर शहरातील बर्हाणपूर रस्त्यावरील दोन खाजगी गोदामात धान्याचा अवैधसाठा आढळुन आल्याने हे गोदाम सिल करण्यात आले होते. तब्बल दहा दिवस या प्रकरणी अहवाल व चौकशी करण्यात आल्यानंतर दि.१० जून रोजी पुरवठा अधिकारी डी.के.पाटील यांनी रावेर पोलीस स्थानकात येऊन फिर्याद दिली होती.
फिर्यादीवरून संशयित आरोपी गणेश देवराम चौधरी रा.रावेर यांच्या चौधरी ट्रेडर्स नावाच्या गोदामात एकूण ७ लाख ७७ हजार २०० रुपयांचा धान्यसाठा आढळुन आला. यामध्ये ९७ गहू कट्टे, २०८ तांदुळाचे कट्टे, ११ ज्वारी कट्टे, १८० मका कट्टे आणि १७,२५० बारदान आढळले. तर संशयित आरोपी मो. रिहान शेख मोईम (रा नागझिरी मोहल्ला) यांच्या गोदामामध्ये २७,४५० रुपये किमतीचा माल यात ८ गहु कट्टे, १७ तांदळाचे कट्टे असा एकूण दोघे गोदामामध्ये आठ लाख ४ हजार ६५० रुपये किमतीच्या धान्याचा अवैध साठा मिळून आला.
या अनुषंगाने रावेर पोलीस स्टेशनला जिवनावश्यक कायदा १९५५ कलम ३ व ७ प्रमाणे दोन्ही संशयित आरोपींविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी तपास सहायक पोलीस निरीक्षक सिध्देश्वर आखेगावकर करीत आहेत. तपासाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार दोन्ही संशयितांना न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला असून ते सध्या जामिनावर आहेत. तसेच गोदामात सापडलेले धान्य हे रेशनचे काम आहे की नाही याचा अहवाल देण्याबाबत पुरवठा अधिकाऱ्यांना पत्र दिले असल्याचे त्यांनी सांगितले.
गुन्हा दाखल केल्यानंतर प्रकरणात काही दिग्गजांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला होता. सील गोदाम लवकरात लवकर खुले करून देण्यासाठी एका ठेकेदाराने ‘धन’लाभ करून देण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू केल्याची जोरदार चर्चा गेल्या आठवड्यात रंगत होती. धन लाभार्थ्यांचा ‘राज’ खुलण्यापूर्वीच एक आदेश झाला आणि गोदामचे सील उघडण्यात आले.
गोदाममध्ये असलेले धान्य रेशनचे असल्यास गरिबांसाठी सोन्यापेक्षा कमी नाही परंतु काही लोक याच सोन्यावर आपली पोळी शेकू पाहत आहेत. तपासात जे आहे ते पुढे समोर येणारच आहे परंतु महसुलच्या अंगरक्षकांनी योग्य भुमिका निभावली तरच ते शक्य होणार आहे. गुन्हा दाखल होऊन आज महिना पूर्ण झाला असून आणि १५ ते १८ दिवसात पुरवठा अधिकाऱ्यांचा अहवाल येणे अपेक्षित आहे. तपासाची गाडी वेगात धावल्यास महसुली विभागातील लाखो किलोमीटरचा टप्पा लवकर गाठून दोषींना शिक्षा मिळणे शक्य होईल.
गोदाममध्ये सील करण्यात आलेला माल नाशवंत असल्याने तो निकाली काढण्याचा निर्णय देण्यात आला होता. धान्य खराब झाल्यास गोदाम मालक प्रशासनावर भरपाईचा दावा करू शकत होते, त्यामुळे ते धान्य त्यांना देण्यात आले आहे. तपासात त धान्य रेशनचे असल्याचे निष्पन्न झाल्यास दोघांना दंडासह रक्कम भरावी लागेल, अशी माहिती प्रांताधिकारी कैलास कडलग यांनी दिली आहे.