जळगांवराजकीय

ब्रेकिंग : जळगाव मनपात महापौरांची भाजपला साथ तर पती तटस्थ!

खान्देश टाइम्स न्यूज | ७ जुलै २०२३ | जळगाव शहर महानगरपालिकेच्या महासभेत आज महाजन दाम्पत्य एकमेकांच्या विरोधात गेल्याचे चित्र पाहायला मिळाले. महापौर जयश्री महाजन यांनी भाजपच्या मागणीला समर्थन दिले तर त्यांच्या विरोधात विरोधी पक्षनेते सुनील महाजन हे तटस्थ राहिले.

शुक्रवारी झालेल्या महासभेत रामानंद पोलीस स्टेशनला गिरणा टाकीजवळ जागा देणेबाबत ठराव महासभेच्या पटलावर आला होता. या ठरावाला सर्वानुमते मंजुरी मिळावी अशी मागणी भारतीय जनता पक्षातर्फे करण्यात आली होती. जळगाव शहराच्या कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न महत्त्वाचा असल्याने याला सर्वांनी मान्य करावी असे भारतीय जनता पक्षाचे म्हणणे होते.

शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक नितीन लढ्ढा यांनी यावर आक्षेप नोंदवित ही जागा आज जरी मनपाच्या मालकीची असली तरी देखील संबंधित जागेबाबत न्यायालयात विवाद सुरू आहे. एका व्यक्तीने ही जागा स्वतःची असल्याचा दावा केला असल्याने याबाबत न्यायालय जो निर्णय देईल त्या निर्णयानंतर पुन्हा महासभेच्या पटलावर हा ठराव आणावा अशी मागणी त्यांनी केली.

विषय भरकटत असल्याने आणि महासभेत दोन गट पडल्याने अखेर यासाठी नगरसेवकांचे मतदान घेण्यात आले. भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक, शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक यांनी ठरावाच्या बाजूने मतदान केले तर ठाकरे गटाच्या नगरसेवकांनी याच्या विरोधात मतदान केले. २२ विरुद्ध ९ अशा मताधिक्याने हा ठराव पारित करण्यात आला. मात्र ठरावाअंती जो निर्णय कोर्ट त्यानुसारच पुढील कारवाई करण्यात येईल असे सांगण्यात आले.

जर न्यायालयाने ही जागा संबंधित व्यक्तीची आहे असे सांगितले तर हा ठराव रद्द करण्यात यावा अशी भूमिका भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांनी मांडले आणि याची नोंद त्या ठरावात घेण्यात आली. मात्र विशेष बाब म्हणजे महापौर जयश्री महाजन यांच्या पत्रान्वये हा ठराव महासभेच्या पटलावर आला होता यामुळे त्यांनी भारतीय जनता पक्षाची साथ दिली तर ठाकरे गटाची साथ देत त्यांचे पती विरोधी पक्षनेते सुनील महाजन यांनी ठरावामध्ये तटस्थ असल्याची भूमिका घेतली.

जळगाव मनपात कधी नव्हे तर विरोधी पक्षनेत्यांनी विरोधात जाण्याची भुमिका घेतली. महापौरांनी भाजपची साथ दिल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button