
सावद्यात पाणीटंचाईचा गंभीर प्रश्न; ताजुशरिया नगर व गौसिया नगरमधील नागरिकांचा नगरपालिकेत ठिय्या आंदोलन
मुख्तार शेख
सावदा ता. रावेर : शहरातील ताजुशरिया नगर आणि गौसिया नगर भागांमध्ये गेल्या काही दिवसांपासून गंभीर पाणीटंचाई निर्माण झाल्याने संतप्त नागरिकांनी सावदा नगरपालिकेवर मोर्चा काढत जोरदार आंदोलन छेडले. या मोर्चाचे नेतृत्व नंदाताई लोखंडे व शेख जावेद यांनी केले. नागरिकांनी थेट पालिकेच्या कार्यालयात ठिय्या देत आपला संताप व्यक्त केला.
निवेदन मुख्याधिकारी अनुपस्थित असताना अधीक्षक प्रमोद चौधरी यांना देण्यात आले. यावेळी ॲड. शेख जावेद, शेख अनीस इब्राहिम, अकिल शेख मंजूर, माजी नगरसेवक फिरोज खान, शेख फिरोज शेख फारूक यांच्यासह मोठ्या संख्येने पाणीटंचाईने त्रस्त महिला आणि पुरुष नागरिक उपस्थित होते.
मुख्याधिकारी अनुपस्थित; संतप्त नागरिकांचा रोष
मोर्चादरम्यान पालिकेचे मुख्याधिकारी कार्यालयात उपस्थित नसल्याने नागरिकांमध्ये प्रचंड नाराजीचा सूर उमटला. “आमच्या समस्या ऐकून घेणारे आणि उपाय करणारे अधिकारीच नाहीत, मग आम्ही जायचं कुणाकडे?” असा सवाल संतप्त महिलांनी केला. त्यामुळे काही काळ वातावरण तणावपूर्ण झाले.
पुरुष आणि महिला कर्मचारी यांच्यावर नागरिकांनी आपला रोष व्यक्त करत, पालिकेच्या निष्क्रियतेचा तीव्र निषेध केला. अनेक नागरिकांनी पाण्याच्या नियमित पुरवठ्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा दिला.
पाणीटंचाईने ग्रस्त भाग हवा
ताजुशरिया नगर व गौसिया नगर भागात अनेक दिवसांपासून नळाला पाणी येत नसल्याने महिलांना लांबवरून पाणी आणावे लागत आहे. उन्हाळ्यात पाण्याची मागणी वाढलेली असताना देखील प्रशासनाचा हलगर्जीपणा गंभीर आहे, अशी टीका नागरिकांनी केली.
नागरिकांचा इशारा ; उपाय न झाल्यास तीव्र आंदोलन
या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पालिकेने तातडीने पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे ठोस पाऊल उचलावे, अन्यथा येत्या काही दिवसांत आणखी मोठे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला.