इतर

कर्जबाजारी पणाला कंटाळून शेतकऱ्याची रेल्वेखाली झोकून  आत्महत्या

कर्जबाजारी पणाला कंटाळून शेतकऱ्याची रेल्वेखाली झोकून  आत्महत्या

जळगाव (प्रतिनिधी): तालुक्यातील डोमगाव गावात कर्जाच्या ओझ्याने त्रस्त झालेल्या एका शेतकऱ्याने रेल्वेखाली झोकून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना सोमवारी (७ जुलै) दुपारी अडीच वाजताच्या सुमारास म्हसावद रेल्वे गेटजवळ घडली. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मृत शेतकऱ्याचे नाव किशोर आसाराम धनगर (वय ३८) असे असून ते डोमगाव येथील रहिवासी होते. शेती हा त्यांचा प्रमुख व्यवसाय असून त्यावरच कुटुंबाचा उदरनिर्वाह चालत होता. त्यांच्या पश्चात आई सुनंदाबाई धनगर, पत्नी उज्ज्वला धनगर, सात वर्षांचा मुलगा आणि पाच वर्षांची मुलगी असा परिवार आहे.

गेल्या काही वर्षांपासून कर्जबाजारीपणामुळे ते मानसिक तणावाखाली होते. यावर्षी लवकर पेरणी केल्यानंतर पावसाने दडी मारल्याने दुबार पेरणीचे संकट त्यांच्यासमोर उभे राहिले होते. यामुळे आर्थिक अडचणीत आणखी वाढ झाली होती.

सोमवारी सकाळी किशोर धनगर नेहमीप्रमाणे शेतावर गेले होते. काही काळ शेतात काम केल्यानंतर त्यांनी म्हसावद रेल्वे गेटजवळ धावत्या पुष्पक एक्सप्रेससमोर उडी घेतली आणि जीवनयात्रा संपवली.

पुढील तपास पोलीस नाईक हेमंत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button