
उत्तरकाशीत अडकलेले जळगावचे भाविक सुखरूप; जिल्हा प्रशासन नियंत्रण कक्षाची तत्परता
जळगाव : उत्तराखंडमधील उत्तरकाशी जिल्ह्यातील धराली गावात सोमवारी झालेल्या ढगफुटीनंतर मोठ्या प्रमाणावर भूस्खलन झाले. या आपत्तीत शेकडो घरं आणि दुकाने मातीच्या ढिगाऱ्याखाली दबल्याची माहिती आहे. मात्र या दुर्घटनेत अडकलेले जळगाव शहरातील अयोध्यानगरमधील मेहरा कुटुंबातील तिन्ही भाविक सुखरूप असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.
उत्तरकाशीतील हर्षिल खोऱ्यातील ‘धराली’ हे गाव गंगोत्री यात्रेच्या मार्गावरील एक महत्त्वाचे ठिकाण आहे. याच ठिकाणी काल ढगफुटीमुळे भीषण नैसर्गिक संकट उद्भवले. या भागात महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांतील पर्यटक अडकले असून, जळगाव शहरातील अयोध्यानगर येथील अनामिका मेहरा, आरोही मेहरा आणि रुपेश मेहरा हे तिन्ही भाविकदेखील त्या ठिकाणी उपस्थित होते.
दुर्घटनानंतर नेटवर्कची समस्या निर्माण झाल्यामुळे या भाविकांशी संपर्क होणं कठीण झाले होते. त्यामुळे त्यांच्या सुरक्षिततेबाबत चिंता वाढली होती. मात्र, जिल्हा प्रशासनाच्या आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षाने उत्तरकाशी येथील ‘माऊंट भागीरथी होम स्टे, हर्षिल’ या निवासस्थानी थेट संपर्क साधला असता, वरील तिन्ही भाविक सुखरूप असल्याची खात्री पटली.
मेहरा कुटुंबाचे वडील चंद्रशेखर नरवरिया हे जिल्हाधिकारी कार्यालयातील नियंत्रण कक्षात आले असता, त्यांच्याच उपस्थितीत संबंधित होम स्टेच्या मालकाशी संपर्क साधण्यात आला. यामुळे त्यांच्या परिवारासह जळगावकरांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
दरम्यान, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष या संपूर्ण घटनेवर सतत लक्ष ठेवून असून संबंधित भाविकांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत आहे.





