जळगावः ;- जळगाव जिल्ह्यात येत्या काळात २६ प्रकल्पांतून १२०० कोटींची गुंतवणूक करण्यात येणार असून यातून सुमारे चार हजार लोकांना प्रत्यक्ष रोजगार मिळणार आहे. तसेच नविन उद्योगांना कमी किंमतीत अपेक्षित जागा मिळावी याकरिता विद्यापीठाच्या मागे ५०० एकर जमिनीचा प्रस्ताव करण्याच्या सूचना दिल्या आहेत, अशी माहिती खा. उन्मेश पाटील यांनी आज जळगाव येथे पत्रकार परिषदेत दिली.
गुंतवणूकदार उद्योजकांशीउद्योग संचालक व जिल्हा उद्योग केंद्राच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषदेचे आयोजन आज हॉटेल प्रेसिडेंट येथे करण्यात आले होते. परिषदेला मोठया संख्येने गुंतवणुकदार संवाद साधतांना खा. उन्मेश पाटील बोलत होते. सुरूवातीला त्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करुन परिषदेला सुरुवात करण्यात आली. महाव्यवस्थापक चेतन पाटील यांनी प्रास्ताविकातून जिल्हा उद्योग केंद्राच्या कामकाजाचा आढावा मांडला. यावेळी २६ गुंतवणुकदार उद्योजकांना सामजास्य करार प्रदान करण्यात येवून त्यांचा स्मृतिचिन्ह देऊन खासदारांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
या परिषदेनंतर आयोजित पत्रकार परिषदेत माहिती देतांना खा. उन्मेश पाटील पुढे म्हणाले
की, जिल्ह्यात उद्योगांना चालना देण्यासाठी या परिषदेचे आयोजन करण्यात आले असून या परिषदेला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला आहे. २६ प्रकल्पांसाठी १२०० कोटी रूपयांच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार झाले आहे. जळगाव जिल्ह्याच्यादृष्टीने ही एक मोठी उपलब्धी आहे. या गुंतवणुकीत गुजराथ अंबुजा कंपनीने ३६६ कोटी, हरीश मुंदडा १७८ कोटी, स्पेक्ट्रम कंपनीची १३० कोटी, सहयोग बायोगॅस ७०, सीएनजी ७० कोटी आदी स्थानिक भूमिपुत्रांसह १२०० कोटींची गुंतवणूक होणार आहे. जळगाव जिल्ह्यातील रोजगाराची गरज लक्षात घेता केळी, मका यावर प्रक्रिया करणारे उद्योगही या ठिकाणी येत आहेत.