
जळगाव :- अट्टल घरफोड्यांना जळगाव गुन्हे शाखेने अटक केली आहे. आरोपींनी सावदा आणि चोपडा शहरात घरफोडी करीत सुरतला पलायन केले होते. अक्षय संजय कोळी (21, रा.अडावद, ता.चोपडा) याला जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अडावदहून अटक केल्यानंतर त्याने साथीदार शांताराम उर्फ शान्या प्रताप कोळी (हातेड, ता.चोपडा) आणि सचिन उर्फ भैय्या रामदास देवरे (रा.सुरत) यांची नावे सांगितल्यानंतर संशयिताना सुरत शहरातून बेड्या ठोकण्या आल्या.
जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे पथकातील पोलीस हेड कॉन्स्टेबल संदीप पाटील, प्रवीण मांडोळे, कमलाकर बागुल, गोरखनाथ बागुल, महेश सोमवंशी यांच्या पथकाने संशयित आरोपी शांताराम कोळी आणि सचिन देवरे या दोघांना गुरुवार, 7 मार्च रोजी सायंकाळी पाच वाजता ताब्यात घेतले. दोघांना पुढील कारवाईसाठी सावदा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आल्याची माहिती पोलीस मुख्यालयातील जनसंपर्क विभागाच्या वतीने शुक्रवार, 8 मार्च रोजी सायंकाळी 6 वाजता दिलेल्या प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवण्यात आली आहे.