जळगाव : एका नामांकित कंपनीचे बिटकॉईन खरेदी करून त्यात अधिकचा नफा देण्याचे अमिष दाखवून सर्वेश किरण भोसले (रा. यशवंत नगर) यांची १४ लाख १२ हजारात फसवणूक करण्यात आली. ही घटना दि. २ मार्च ते दि. ४ मार्च दरम्यान ऑनलाईन पद्धतीने घडली. या प्रकरणी दि. ९ मार्च रोजी सायबर पोलिस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील यशवंत नगरात सर्वेश भोसले हे वास्तव्यास असून त्यांच्याशी अनोळखीने दि. २ ते दि. ४ मार्च दरम्यान संपर्क साधून टेलिग्राम खात्यावर एक लिंक पाठवली. तिला क्लिक केल्यानंतर क्रिप्टो करंसीसंबंधीत कंपनीचा लोगो, बनावट वेबसाईट नामांकित कंपनीचे असल्याचे भासवण्यात आले. त्यानंतर भोसले यांना बिटकॉईन विकत घेण्यास सांगून सुरुवातीला एक हजार ८०० रुपये नफा दिला.
त्यामाध्यमातून विश्वास संपादन करून त्यांच्याकडून वेळोवेळी एकूण १४ लाख १२ हजार ९२६ रुपये स्वीकारले. त्यावर नफा व मुद्दलही मिळत नसल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात आले व भोसले यांनी सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक किसन नजन पाटील करीत आहेत.