मुंबई = : मुख्यमंत्री असताना ‘मी पुन्हा येईन’ असे जरूर बोललो होतो; पण ते केवळ एक वाक्य नव्हते. सत्तेत आल्यावर काय करणार अशा बऱ्याच गोष्टी त्यात होत्या. त्यासाठी जरासा वेळ लागला. पण अडीच वर्षांनी दोन पक्ष फोडूनच सत्तेत आलो, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी मुंबईत केले.
लेखिका प्रियम गांधी यांच्या ‘काँग्रेस ना होती तो क्या होता’ पुस्तकाचे प्रकाशन वरळीतील एका हॉटेलात उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाले.
या पुस्तक प्रकाशनानंतर प्रियम गांधी यांनी फडणवीस यांच्याशी संवाद साधला. यावेळी बोलताना फडणवीस म्हणाले, देश स्वतंत्र झाल्यानंतर काँग्रेस अनेक वर्षेसत्तेत राहिली. या पक्षाची त्या काळी एकाधिकारशाही होती. आज देशात अनेक पक्ष निर्माण झाले; पण या पक्षांनी काँग्रेसच्या पठडीतील राजकारण केले. घराणेशाही आणि पैशांच्या जोरावर राजकारणाचा पायंडा काँग्रेसने पाडला. पण भाजप हा एकमेव पक्ष होता, ज्याने काँग्रेसची विचारधारा व त्यांच्या राजकारणाला नाकारत स्वतंत्र शैली विकसित केली. भाजपने नेहमीच घराणेशाहीला विरोध केला,
पण कुणालाही राजकारणात येण्यापासून रोखले नाही. नेत्यांच्या पुढच्या पिढीने राजकारण करावे, पण आपल्या हिंमतीवर करावे. केवळ आपला राजकीय हक्क समजून ते करू नये. इतर क्षमतावान लोकांना डावलून राजकीय कुटुंबांतील व्यक्तींना राजकारणात आणले जाते, त्याला घराणेशाही म्हणतो.