जळगाव : – महापालिकेच्या प्रशासक तथा आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांची लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बदली करण्यात आली आहे. त्यांना अद्याप पदस्थापना देण्यात आलेली नाही. त्यांचा प्रशासक तथा आयुक्तपदाचा पदभार अतिरीक्त आयुक्त पल्लवी भागवत यांच्याकडे देण्यात आला आहे.
लोकसभा सार्वत्रिक निवडणुका २०२४ च्या अनुषंगाने भारत निवडणूक आयोगाने महानगरपालिकांमधील आयुक्त, अतिरिक्त आयुक्त व उपयुक्त या पदांवरील अधिकाऱ्यांच्या बदल्या आदेश मंगळवारी शासनाच्या उपसचिव प्रियंका कुलकर्णी-छापवाले यांनी काढले आहेत. यानुसार जळगाव महानगर पालिकेच्या आयुक्त डॉ. विद्या गायकवाड, पनवेल महानगर- पालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांची बदली करण्यात आलेली आहे.
त्यांचा पदभार अधिनस्त असलेले अतिरीक्त आयुक्त यांच्याकडे सुपूर्द करण्याचे आदेश देण्यात आले आहे. या पदावरून तात्काळ पदमुक्त होत तसा अहवाल पाठवण्याचे आदेश देखील शासनाने दिले आहेत. तसेच बदली झालेल्या अधिकाऱ्यांच्या पदस्थापनेचे स्वतंपणे आदेश काढण्यात येतील असे देखील आदेशात नमुद करण्यात आले आहे.