खान्देश टाइम्स न्यूज | २ एप्रिल २०२४ | रावेर येथे दाखल असलेल्या दुचाकी चोरीच्या गुन्ह्याचा तपास करताना पथकाला मिळालेल्या माहितीवरून दोघांच्या मुसक्या आवळण्यात आल्या. पोलिसांनी दोघांकडून ४ दुचाकी हस्तगत केल्या आहेत. विशेष म्हणजे चारही दुचाकी वेगवेगळ्या तालुक्यातून चोरण्यात आल्या आहेत.
जळगांव जिल्हयातील मोटार सायकल चोरीचे गुन्हे उघडकिस आणण्याबाबत पोलीस अधीक्षक यांनी आदेशीत केले होते. रावेर पोलीस स्टेशन गुन्हे शोध पथकाने रावेर पोलीस स्टेशन हद्दीत लिलाधर नारायण पाटील रा. नांदुरपिंप्री ता.मुक्ताईनगर जि.जळगांव यांच्या फिर्यादवरुन रावेर पोलीस स्टेशन येथे दाखल गुन्ह्यातील दुचाकीचा शोध सुरू केला होता.
चोरीची दुचाकी रावेर बसस्थानक येथून दि.३० मार्च रोजी चोरीस गेली असता मोटार सायकलचा सीसीटिव्ही फुटेज व तंत्रज्ञानाच्या सहाय्याने व गुप्त बातमीदारामार्फत शोध घेवून घेतला असता आरोपी क्रमांक चंद्रकांत रामदास साळुंखे वय ४६ रा.हिराशिवा कॉलनी जळगांव, भरत गणेश सोनवणे वय ३२ रा.वढोदा ता.यावल यांना ताब्यात घेण्यात आले. दोघांना विश्वासात घेवुन विचारपुस केली असता रावेर, वरणगांव, जळगांव, बुऱ्हाणपुर (मध्य प्रदेश) येथुन ४ दुचाकी चोरी केल्याची कबुली त्यांनी दिली.
संपूर्ण कामगिरी पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, सहाय्यक पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह, पोलीस निरीक्षक डॉ.विशाल जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकातील पोलीस अंमलदार ईश्वर चव्हाण, सुरेश मेढे, समाधान ठाकुर, सचिन घुगे, विशाल पाटील, प्रमोद पाटील, अमोल जाधव, महेश मोगरे, विकार शेख, सुकेश तडवी यांच्या पथकाने केली आहे.