२७ पेक्षा अधिक वन्यजीवांच्या प्रजातींची नोंद; ४९२वन्यप्राणी-पक्षी,बिबट्यासह दुर्मीळ प्रजातींचे दर्शन

बुद्ध पौर्णिमेनिमित्त यावल वनविभागात ‘निसर्ग अनुभव’ आणि वन्यप्राणी प्रगणना उत्साहात
जळगाव बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने यावल प्रादेशिक वनविभागात ‘निसर्ग अनुभव’ उपक्रमांतर्गत वन्यप्राणी प्रगणना कार्यक्रम अत्यंत उत्साहात पार पडला. प्राणी गणनेसाठी यावल वनविभागाने ३९ मचाणांचे नियोजन केले होते. या उपक्रमात १५० हून अधिक निसर्गप्रेमी, पर्यावरणप्रेमी, वन व इतर विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. प्रज्वलित पौर्णिमेच्या लख्ख प्रकाशात संपूर्ण रात्र जंगलात थांबून विविध प्रजातींच्या वन्यजीवांचे निरीक्षण करण्यात आले.
प्राणी प्रगणनेदरम्यान बिबट्या, अस्वल, कोल्हा, लांडगा, ससा, भेकर, निलगाय, रानडुक्कर, चिंकारा, चौशिंगा, काळवीट, साळिंदर यांसारख्या प्राण्यांसह विविध पक्ष्यांच्या प्रजातींचे निरीक्षण करण्यात आले. यावर्षी एकूण ४९२ वन्यजीव आणि पक्ष्यांची नोंद करण्यात आली असून एकूण २७ हून अधिक प्रजातींचे दर्शन झाले. सहभागी निसर्गप्रेमी व अभ्यासकांनी आपले निरीक्षण अभिप्राय स्वरूपात नोंदवले.
या कार्यक्रमासाठी ऑनलाइन रजिस्ट्रेशन प्रणाली (QR Code) वापरण्यात आली होती. रात्रीच्या वेळी जंगलात मचाणावरून निरीक्षण करणे ही निसर्गप्रेमींसाठी थरारक व अविस्मरणीय अनुभूती ठरली. विशेष म्हणजे रावेर वनक्षेत्रात बिबट्याचे दर्शन घडले, तर वैजापूर वनक्षेत्रात बिबट्याच्या पाऊलखुणा आढळल्या.
सदर उपक्रमासाठी अतिरिक्त पोलीस अधीक्षक श्री. अशोक नखाते, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी श्री. कुर्बान तडवी, सहाय्यक वनसंरक्षक श्री. समाधान पाटील, तहसीलदार रावेर श्री. बंडू कापसे, मानद वन्यजीव रक्षक श्री. रविंद्र फालक, वन्यजीव अभ्यासक श्री. अमन गुजर, विविध संस्था, महाविद्यालयीन प्राध्यापक व अधिकारी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन वनसंरक्षक (प्रादेशिक) धुळे वनवृत्त श्रीमती निनू सोमराज, उप वनसंरक्षक श्री. जमीर शेख, सहाय्यक वनसंरक्षक श्री. प्रथमेश हाडपे आणि समाधान पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली यावल वनविभागातील सर्व वनपरिक्षेत्र अधिकारी, वनपाल, वनरक्षक व वनमजूर यांनी केले.
या उपक्रमाबाबत समाधान पाटील यांनी सांगितले की, “ढगाळ वातावरण आणि पावसाच्या शक्यतेमुळे अडथळा येईल असे वाटत असतानाही निसर्गप्रेमींनी विविध वन्यजीवांचे दर्शन घेतले. अचानक बदललेल्या हवामानामुळे प्राण्यांच्या हालचाली, वर्तन यांचे निरीक्षणही वेगळ्या पद्धतीने अनुभवता आले.”
—