गुन्हेजळगांव

धक्कादायक : नातूने केली आजीची हत्या; ४ तासात एलसीबीच्या जाळ्यात

खान्देश टाइम्स न्यूज | १७ मे २०२४ | पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर गावात एका ८० वर्षीय वृद्धेची हत्या करुन तिचा मृतदेह गोणपाटमध्ये भरुन ठेवल्याची घटना बुधवारी सायंकाळी उघडकीस आली होती. जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवघ्या ४ तासात गुन्ह्याची उकल केली असून कर्ज फेडण्यासाठी आजी पैसे देत नसल्याने नातवानेच तिचा खून केला असल्याचे समोर आले आहे. पैशांसाठी वृद्धेचा खून केल्याची ही आठवडाभरातील तिसरी घटना आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर येथील रहिवासी असलेल्या मांजाबाई दगडु भोई, वय ८० या आपल्या घरात एकट्याच राहत होत्या. बुधवारी सायंकाळी वृद्धेला कोणीतरी अज्ञात इसमाने तिचे घरात तिला जिवेठार मारुन गोणपाटमध्ये बांधून ठेवले असल्याचे उघडकीस आले होते. पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांनी घटनास्थळी जावून पुढील तपास करणेबाबत आदेश दिले होते.

स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक किसनराव नजनपाटील, सफौ विजयसिंग पाटील, पोह लक्ष्मण पाटील, विजय पाटील, महेश महाजन, अकरम शेख, महेश सोमवंशी हे सर्व फत्तेपुर ता.जामनेर येथून खुनाचा तपास करीत असताना पिंपळगाव हरेश्वर येथे पोहचले. गावात गोपनीय बातमीदारामार्फत माहिती काढली असता मयत मांजाबाई दगडु भोई हिचे बहिणीचा नातू विशाल भोई याने हे कृत्य केले असल्याची दाट शक्यता असल्याची बातमी पथकाला मिळाली.

रुग्णालयातून घेतले ताब्यात
पथकाने विशाल भोई हा कुठे असल्याची माहिती घेतली असता तो पाचोरा येथे मयताचे प्रेतासोबत ग्रामीण रुग्णालय पाचोरा येथे गेला असल्याचे समजले. त्यावरून पथकासह पिंपळगाव हरेश्वर येथून पोह रणजीत पाटील, जितेंद्र पाटील, दिपक आहिरे नेम. पिंपळगाव हरेश्वर पो.स्टे. असे सर्व पाचोरा येथे आले. त्यास ताब्यात घेवून त्यास त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव विशाल प्रभाकर भाई, वय २२, रा. पिंपळगाव हरेश्वर ता.पाचोरा असे सांगीतले.

कर्ज फेडण्यासाठी केला खून
पथकाने विशाल भोई यास विश्वासात घेवून विचारपुस केली असता त्याने सांगीतले की, माझ्यावर कर्ज झाले असल्याने कर्ज फेड करणेकरीता मी आजीकडून पैश्यांची मागणी केली होती. त्यावर आजीने मला नकार दिल्याने मी आजी मंजाबाई हिचा गळा दाबुन तिला जिवेठार मारले. त्यानंतर तिचे हातातील चांदीचे गोटपाटल्यापैकी १ गोटपाटली व कानातील सोन्याच्या बाळया काढून घरात असलेल्या गोणपाटमध्ये भरुन तिथे घरात ठेवले. व मी मागच्या दरवाज्याने बाहेर निघुन मोटार सायकलने अजिंठा ता. अजिंठा जि.संभाजीनगर येथे जावून तिथे एका सोनार दुकानावर मोडून तिथून पैसे घेवून परत पिंपळगाव हरेश्वर येथे घरी आलो होतो. अशी गुन्ह्याची कबुली दिली आहे.

आरोपी पिंपळगाव पोलिसांच्या ताब्यात
संशयीत आरोपी विशाल प्रभाकर भाई, वय २२, रा. पिंपळगाव हरेश्वर ता. पाचोरा यास गुन्ह्याचे पुढील तपासकामी पिंपळगाव हरेश्वर पो.स्टे.चे ताब्यात देण्यात आले आहे. गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी पाचोरा भाग धनंजय येरूळे यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button