खान्देश टाइम्स न्यूज | १६ मे २०२४ | अजिंठा चौफुलीकडून सुप्रीम कॉलनीकडे जाणाऱ्या दुचाकीस्वार महिलेच्या गळ्यातून मंगळसूत्र लांबवल्याची घटना दि.१३ मे रोजी रात्री घडली होती. एमआयडीसी पोलिसांनी अवघ्या काही तासात दोघांच्या मुसक्या आवळल्या असून त्यांना न्यायालयाने ३ दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार दि.१३ रोजी रात्री ९.३० वाजेचे सुमारास खुशी प्रविण महाजन रा.सुप्रीम कॉलनी ह्या त्यांची आई लताबाई सखाराम पाटील यांचे सोबत ज्युपीटर मोटार साइकलने अजिंठा चौफुली जळगाव येथुन सुप्रीम कॉलनीकडे जात होत्या. काशीनाथ चौफुली जवळील पेट्रोल पंप जवळ एच एफ डिलक्स मोटार साइकलवर आलेल्या दोन इसमांपैकी मागे बसलेल्या इसमाने चालत्या मोटर साइकलवरून खुशी महाजन यांच्या गळयातुन १० ग्रम वजनाची मणी मंगळसुत्राची पोत बळजबरीने काढुन घेतली होती.
याप्रकरणी खुशी महाजन यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एच एफ डिलक्स वरील दोन अज्ञात इसमांविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर दोन अज्ञात इसम हे तांबापुरा परीसराकडे पळून गेले असल्याची माहिती तसेच सदरचा गुन्हा हा रेकॉडवरील गुन्हेगारांनी केला असल्याची माहिती पोलीस निरिक्षक बबन आव्हाड यांना मिळाली होती. त्याप्रमाणे तांबापूरा परीसरातून पथकाने रेकॉर्डवरील गुन्हेगारांस ताब्यात घेतले होते. तसेच सदरचा गुन्हा त्याने केल्याचे कबुल केले होते व त्याच्या सोबत असलेल्या दुस-या साथीदाराचे नाव सांगितले होते. त्याला सुद्धा तांबापुरा परीसरातून ताब्यात घेतले होते.
दोघांना अटक करण्यात येवून न्या.जी.आर कोलते यांचे न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना ३ दिवसांची पोलीस कस्टडी रिमांड दिली असून सरकारतर्फे अॅड.स्वाती निकम यांनी कामकाज पाहिले होते. चैन स्नॅचिंग घडल्यानंतर सहा तासाचे आत एम आय डी सी पोलीसांनी गुन्हा उघडकीस केला आहे. यातील आरोपी १ याचेवर खुन करणे, जबरी चोरी करणे, हत्यार बाळगणे यासारखे गुन्हे यापूर्वी दाखल आहे.
संपूर्ण कामगिरी पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधीकारी, भाग जळगाव संदिप गावित यांचे मार्गदर्शनाखाली एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड, पोउपनि दत्तात्रय पोटे, पोउपनि निलेश गोसावी, अतुल वंजारी, किरण पाटील, किशोर पाटील, राजेंद्र कांडेलकर, सचिन पाटील, चंद्रकांत पाटील, सतिष गर्जे, राहुल रगडे, छगन तायडे, योगेश बारी, राहुल पाटील यांनी पार पाडली आहे.