
वाळू तस्करांमध्ये धुमश्चक्री : तलवार-कोयत्यांनी तिघांवर प्राणघातक हल्ला
भडगाव पोलिसांत चार जणांविरोधात गुन्हा
भडगाव (प्रतिनिधी) – वाळू तस्करीसंदर्भातील जुन्या वादातून चार जणांच्या टोळीने वाक गावात रस्त्यात गाडी थांबवून तलवार, कोयता आणि लाकडी दांडक्यांनी तिघांवर अमानुष हल्ला केला. गुरुवारी (२ मे) रात्री ११.३० वाजता घडलेल्या या घटनेत तिघे गंभीर जखमी झाले असून, त्यांना धुळे येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे. या प्रकरणी भडगाव पोलीस ठाण्यात चार आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राकेश सुधाकर पाटील (वय २८, रा. वाक) यांच्या फिर्यादीनुसार, ते त्यांच्या कुटुंबीयांसोबत गाडीतून जात असताना इंडिका व्हिस्टा (MH-42-AU-4249) गाडीने त्यांच्या गाडीला पाठीमागून धडक दिली. त्यानंतर गाडीतून आरोपी योगेश कैलास पाटील, उमेश शालीक पाटील, सतिष शालीक पाटील आणि अक्षय बारकू पाटील उतरले. योगेशने राकेशवर तलवारीने हल्ला करत डाव्या हाताच्या मनगटाला गंभीर इजा केली. वडील सुधाकर पाटील व काका किशोर पाटील मदतीला धावले असता त्यांच्यावरही लाठी व तलवारीने बेदम मारहाण करण्यात आली.
‘सोडू नका, कापून टाका’ – आरोपींची उघड धमकी
हल्ला करताना आरोपी सतत “सोडू नका, कापून टाका” असे धमकीवजा शब्द उच्चारून भीतीदायक वातावरण निर्माण करत होते. कुटुंबातील इतर सदस्यांनी प्रसंगावधान राखत जखमींना रुग्णालयात हलवले. मात्र, आरोपींनी रुग्णवाहिका अडवण्याचा प्रयत्न करत अधिक घातक पाऊल उचलण्याचा प्रयत्न केला.
गुन्हा दाखल, तपास सुरु
या गंभीर घटनेनंतर योगेश कैलास पाटील, उमेश शालीक पाटील, सतिष शालीक पाटील आणि अक्षय बारकू पाटील यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ अंतर्गत विविध गंभीर कलमांखाली गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल संजय पाटील करीत आहेत.