खान्देश टाइम्स न्यूज l २३ ऑगस्ट २०२४ l प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख आ.बच्चू कडू हे शुक्रवार दि.२३ ऑगस्ट रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने ते जिल्ह्यात येणार असून चाळीसगाव, भुसावळ आणि रावेर-यावल विधानसभा मतदार संघात भेटी देणार आहेत. पक्षाचे उत्तर महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अनिल चौधरी हे त्यानुसार नियोजन करीत आहे.
महाराष्ट्र राज्याची विधानसभा निवडणूक काही महिन्यांवर येऊन ठेपली असून सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. प्रहार जनशक्ती पक्षाने अद्याप आपली भूमिका जाहीर केलेली नसून ते काय भुमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. नुकतेच छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या आक्रोश मोर्चातील गर्दीने राज्याचे लक्ष प्रहार संघटनेकडे वेधले गेले होते. आ.बच्चू कडू यांनी सरकारला वेळ दिला असून मागण्या मान्य न झाल्यास सप्टेंबरमध्ये मुंबईत मोर्चा काढणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने प्रहारचे अध्यक्ष आ.बच्चू कडू दि.२३ ऑगस्ट रोजी जळगाव जिल्हा दौऱ्यावर येत आहे. सकाळी चाळीसगाव येथे आगमन, एका उद्घाटन समारंभाला भेट देऊन ते पदाधिकाऱ्यांच्या भेटी घेणार आहेत. त्यानंतर ते भुसावळ येथे उत्तर महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अनिल चौधरी यांच्या घरी भेट देणार असून जळगाव, भुसावळ येथील पदाधिकाऱ्यांशी चर्चा केल्यावर ते यावलकडे प्रस्थान करतील. रावेर येथे पदाधिकाऱ्यांच्या भेटी घेतल्यावर सावदा येथे महिलांसाठी आयोजित स्नेह संवाद मेळाव्याला ते संबोधित करतील.
आ.बच्चू कडू यांचा एकदिवसीय दौरा असून आगामी निवडणुकीच्या दृष्टीने तो महत्वाचा मानला जात आहे. जळगाव जिल्ह्यातील दिव्यांग बांधव, प्रहार संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक यांनी जास्तीत जास्त प्रमाणात दौऱ्यात सहभागी व्हावे असे आवाहन, प्रहार जनशक्ती पक्षाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अनिल चौधरी यांनी केले आहे.